Narli Poornima: करंजा येथे पारंपरिक पध्दतीने नारळी पौर्णिमा साजरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 07:53 PM2022-08-11T19:53:52+5:302022-08-11T19:54:15+5:30
Narli Poornima: उरण तालुक्यात करंजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल येथे नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधवांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला.
- मधुकर ठाकूर
उरण : उरण तालुक्यात करंजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल येथे नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधवांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथील विद्यार्थ्यांनीही सालाबाद प्रमाणे आपला पारंपारीक सण साजरा केला.त्यात त्यांनी प्रतिकात्मक सोनेरी नारळ तयार केला होता.या प्रथेप्रमाणे सोन्याच्या नारळाची पूजा करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांच्या हस्ते पार पडली.
त्यानंतर सजविलेल्या गाडीमध्ये तो नारळ मिरवणूकीने वाजतगाजत समुद्रकिनारी नेण्यात आला. तिथे पूजा करुन होडीने खोल समुद्रात नेऊन अर्पण केला.यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारीक कोळ्याचा पोषाख परिधान केला होता.
यावेळी वृक्षांनाही राख्या बांधण्यात आल्या. तसेच समुद्र किनारी तयार केलेल्या स्टेजवर विद्यार्थ्यांनी कोळी नृत्यही सादर केली.काळाप्रमाणे या सणामध्येही जुन्या कोळीगीतांसह आधुनिक गीतांचेही स्वर गुंजले. पारंपारिक वाद्यांच्या जागी डॉल्बी सिस्टीमने आलीय.पद्धती बदलत चालल्यात. पण उत्साहाची कुठेच कमतरता भासली नाही.खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी करंजा येथील विद्यार्थीनीही श्रीफळ अर्पण करण्यात आला. ही बाब निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा पुढे चालण्यासाठी आशादायी आहे.नारळी पोर्णिमेच्या या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.