भोंदू बाबांचा सुळसुळाट, घरातील महिलांना बनवतात सावज; परळीत सुज्ञ नागरिकांनी केला पर्दाफाश
By निखिल म्हात्रे | Published: December 11, 2023 03:55 PM2023-12-11T15:55:35+5:302023-12-11T15:56:14+5:30
गावात फिरत असलेले भोंदू बुवा एकटी महिला पाहून घरात घुसत होते.
अलिबाग - पाली येथील काही भागात भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला आहे. भगवी वस्त्रे परिधान केलेले हे बाबा खोटे चमत्कार दाखवून घरातील महिलांना सावज बनवून त्यांच्याकडून पैसे लुबाडत होते. परळी व जांभूळपाडा परिसरात अनेक घरात शिरून या बाबांनी पैसे लाटले आहेत. येथील सुज्ञ नागरिकांनी रविवारी या तीन बाबांना पकडून समज दिली. सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांनी सोमवारी पाली पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली.
गावात फिरत असलेले भोंदू बुवा एकटी महिला पाहून घरात घुसत होते. आणि रिकाम्या हातातून रुद्राक्ष काढणे, छोट्या भस्मचे मोठी भस्माची पुडी बनविणे, कमंडलुतून शंकराची पिंड काढणे असे चमत्कार करून दाखवत होते. गोड बोलून खोटे दावे करत होते. त्यानंतर या महिलांना घरातून पैसे दान करा असे सांगून बोलण्यात गुंगवून अधिकची रक्कम आणायला सांगून तिथून पोबारा करत होते. अशा प्रकारे परळी जांभूळपाडा परिसरातील अनेक जणांची फसवणूक या भोंदू बाबांनी केली आहे. असे येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांनी सांगितले. हे भोंदू बाबा एका घरात शिरले असतांना राहुल गायकवाड व ग्रामस्थांनी त्यांना पकडले व जांभुळपाडा दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात नेले व या भोंदू बाबांना चांगली समज दिली. त्यांचे आधार कार्ड तपासले असता ते खोटे होते. हे भोंदू बाबा जालना येथील असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
अलिबाग - पाली येथील काही भागात भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला आहे. भगवी वस्त्रे परिधान केलेले हे बाबा खोटे चमत्कार दाखवून घरातील महिलांना सावज बनवून त्यांच्याकडून पैसे लुबाडत होते. परळी व जांभूळपाडा परिसरात अनेक घरात शिरून या बाबांनी पैसे लाटले आहेत. येथील सुज्ञ नागरिकांनी रविवारी… pic.twitter.com/VfdUxBQWEo
— Lokmat (@lokmat) December 11, 2023
या प्रकरणाबाबत मी अधिक माहिती घेत आहे. लोकांनी कोणीही अनोळखी व्यक्ती आल्यास त्याला घरामध्ये घेऊ नये. त्याच्या कोणत्याच मागण्या पूर्ण करू नये. यावेळी लागलीच आजूबाजूच्या लोकांना बोलवावे. या व्यक्तीचा संशय आल्यास ताबडतोब 112 नंबरवर कॉल करावा. पोलीस त्या ठिकाणी पोहचून पुढील कार्यवाही करतील.
- सरिता चव्हाण, पोलीस निरीक्षक, पाली
चमत्काराचा दावा करणारे हे बाबा भोंदू असतात. यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अशा भोंदू बाबांवर कारवाई होऊ शकते. कमीतकमी सहा महिने शिक्षा आणि जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा असू शकते. ज्यात दंड 5000 ते 50000 रुपये पर्यंत आहे. हे गुन्हे अजामीनपात्र आणि दखलपात्र आहेत.
- मोहन भोईर, कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड
हे साधू घरामध्ये शिरले. परमार्थ करत असल्याने मी त्यांना 20 रुपये दिले. मात्र त्यांनी खोटे चमत्कार दाखविण्यास व खोटे दावे सांगण्यास सुरुवात केली. ही लबाडी कळल्यावर लागलीच मी त्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले. व शेजारील महिलेला बोलावले लागलीच या बाबांनी तेथून पळ काढला.
रिया राहूल गायकवाड, गृहिणी, परळी