अलिबाग - पाली येथील काही भागात भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला आहे. भगवी वस्त्रे परिधान केलेले हे बाबा खोटे चमत्कार दाखवून घरातील महिलांना सावज बनवून त्यांच्याकडून पैसे लुबाडत होते. परळी व जांभूळपाडा परिसरात अनेक घरात शिरून या बाबांनी पैसे लाटले आहेत. येथील सुज्ञ नागरिकांनी रविवारी या तीन बाबांना पकडून समज दिली. सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांनी सोमवारी पाली पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली.
गावात फिरत असलेले भोंदू बुवा एकटी महिला पाहून घरात घुसत होते. आणि रिकाम्या हातातून रुद्राक्ष काढणे, छोट्या भस्मचे मोठी भस्माची पुडी बनविणे, कमंडलुतून शंकराची पिंड काढणे असे चमत्कार करून दाखवत होते. गोड बोलून खोटे दावे करत होते. त्यानंतर या महिलांना घरातून पैसे दान करा असे सांगून बोलण्यात गुंगवून अधिकची रक्कम आणायला सांगून तिथून पोबारा करत होते. अशा प्रकारे परळी जांभूळपाडा परिसरातील अनेक जणांची फसवणूक या भोंदू बाबांनी केली आहे. असे येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांनी सांगितले. हे भोंदू बाबा एका घरात शिरले असतांना राहुल गायकवाड व ग्रामस्थांनी त्यांना पकडले व जांभुळपाडा दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात नेले व या भोंदू बाबांना चांगली समज दिली. त्यांचे आधार कार्ड तपासले असता ते खोटे होते. हे भोंदू बाबा जालना येथील असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.