पनवेल - मावळ लोकसभा मतदार संघासाठी दि.13 रोजी मतदान पार पडणार आहे. पनवेलमध्ये 544 मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून रविवार 12 रोजी दुपारी 1 च्या सुमारास या केंद्रांचा ताबा घेतला. रविवारपासुन सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया पार पडल्याशिवाय हे कर्मचारी या केंद्रावरच राहणार आहेत.
या प्रक्रियेत 2404 कर्मचारी आणि 1450 पोलीस आणि 735 होम गार्डस कार्यरत राहणार आहेत. पनवेलमध्ये 5 लाख 91 हजार 338 मतदार आहेत. सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 1 हजार 88 बॅलेट युनिट,750 कंट्रोल युनिट आणि 788 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. मागील महिना भरपासून निवडणुकीचा प्रचार, मतदान जनजागृती यांसारखे कार्यक्रम सुरु होते. शनिवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्याने मतदारांच्या हातात उमेदवारांचे भवितव्य असणार आहे. 544 मतदान केंद्रावर खास महिलांसाठी पिंक मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली असुन वाजेकर हायस्कुलमध्ये हे केंद्र असणार आहे. सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर या केंद्राची जबाबदारी असणार आहे. पनवेलमध्ये यावर्षी एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.आदर्श आचार संहितेचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी असणार आहे.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आम्ही महिनाभरापासून परिश्रम घेत आहोत.वेगवेगळ्या स्वरूपाची जनजागृती केली गेली.शासनाने मतदानाच्या दिवशी सुट्टी देखील जाहीर केल्याने मतदारांनी घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावे जेणे करून प्रशासनाच्या मेहनतीच देखील चीज होईल.- राहुल मुंडके (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,पनवेल)