देशाला हादरवणार्या मणिपूरमधील विभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस व पनवेल तालुका काँग्रेसच्यावतीने कळंबोली येथे दि.24 रोजी धिक्कार आंदोलन करण्यात आले. मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढून त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक पाशवी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
मणिपूर राज्यात मागील दोन महिन्यांपासून दंगली सुरू आहेत. त्यातच २ आदिवासी महिलांवर सामूहिक अत्याचार तथा नग्न धिंड काढण्याचा घृणास्पद व्हिडीओ समोर आला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने समाजमन हादरले असून सर्वत्र या घटनेने संताप उसळला आहे. याबाबत काँग्रेस देखील आक्रमक झाली के एल टू चौक कळंबोली येथे मणिपूर येथील अमानवीय घटनेच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटिल म्हणाले, मणिपूर येथे घडलेली घटना समस्त मानवजातील काळिमा फासणारी आहे.
तब्बल 77 दिवसानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतरही मणिपूर राज्य व केंद्रातील भाजप सरकार याविरोधात एकही शब्द काढायला तयार नाही. ज्या देशात महिलांना आपण देवीचे रुप मानतो त्याच महिलांवर अशातऱ्हेने अत्याचार करणाऱ्या समाजकंटकांना फाशीची शिक्षा मिळावी असे पाटील यांनी सांगितले.