अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे तीन हजार अंगणवाड्यांना कुलूप

By निखिल म्हात्रे | Published: January 11, 2024 05:46 PM2024-01-11T17:46:32+5:302024-01-11T17:47:28+5:30

जिल्ह्यातील ६२ हजार बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर.

in raigad alibaugh 3000 anganwadis locked due to strike of anganwadi workers | अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे तीन हजार अंगणवाड्यांना कुलूप

अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे तीन हजार अंगणवाड्यांना कुलूप

निखिल म्हात्रे, अलिबाग : अंगणवाडी सेविकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला एक महिना उलटून गेला आहे. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक अंगणवाड्या बंद असल्याने ६२ हजारांहून अधिक बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाभरात ६० हून अधिक असणाऱ्या कुपोषित बालकांच्या आहाराबाबत कोणतीही हेळसांड होत नसून त्यांना महिला बचत गटाकडून आहार देण्याचे काम सुरू असल्याचा दावा महिला बालकल्याण विभागाने केला आहे.

अंगणवाडी परिसरात शुकशुकाट:

सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. भरीव मानधन जाहीर करावे. सामाजिक सुरक्षा मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सोमवार ४ डिसेंबर २०२३ पासून संप सुरू केला आहे. ३८ दिवस उलटूनही संप सुरूच आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमधील मुलांचा किलबिलाट थंडावला आहे. 

गजबजणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये महिनाभरापासून शुकशुकाट आहे. त्यामुळे तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणाबरोबरच बौद्धिक व शारीरिक विकासावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

विविध शासकीय कामे रखडली :

अंगणवाडी सेविकांमार्फत होणाऱ्या गृहभेटी, लसीकरण मोहीम, गरोदर माता, स्तनदा मातांचे लसीकरण, पोषण आहार, ई-आकार प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, ऑनलाइन माहिती भरणे, रजिस्टर भरणे, जनजागृतीपर कार्यक्रम राबविणे, शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबविणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणे, भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवून देणे, किशोरवयीन मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी निधी मिळवून देणे, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनासोबत काम करणे, अशी अनेक कामे रखडली आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत सरकारने कोणतीही भूमिका न घेतल्याने त्या अजूनपर्यंत दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे.

संप मोडीत काढण्यासाठी दबावतंत्र:

तुटपुंज्या मानधनामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी ४ डिसेंबरपासून लढा सुरू केला आहे. या संपाला ३८ दिवस झाले आहेत. अंगणवाडी सेविकादेखील त्यांच्या ठाम भूमिकेवर आहेत. संप मोडीत काढण्यासाठी अंगणवाडी सेविकांना नोटिसा बजाविल्या आहेत. काहींना कामावर हजर न राहिल्यास काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे संप मोडीत काढण्यासाठी दबावतंत्राचा वापर होत असल्याचा आरोप केला जात आहे.

जिल्ह्यात ३ हजार ९८ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ८०० अंगणवाड्या सुरू आहेत. त्यात खालापूर, उरण, माणगाव, तळा व काही प्रमाणात अलिबाग तालुक्यातील अंगणवाड्यांचा समावेश आहे. अंगणवाडी सेविकांना बालविकास प्रकल्प विभागामार्फत नोटिसा बजाविल्या आहेत- निर्मला कुचिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला, बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद

Web Title: in raigad alibaugh 3000 anganwadis locked due to strike of anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.