अलिबाग - हर हर महादेव आणि ओम नम: शिवायच्या गजरात रायगड जिल्ह्य़ात महाशिवरात्रीचा उत्सव शुक्रवारी मोठय़ा उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. यानिमित्ताने जिह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. तसेच काही ठिकाणी भजन, कितर्न व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अलिबाग येथील उंच डोंगरावर असलेल्या श्रीक्षेत्र कनकेश्वर व सिद्धेश्वर येथे पहाटे 4 वाजल्यापासूनच भाविक दर्शनासाठी पोहोचले होते. शहरातील काशी विश्वेश्वर मंदिर, वेश्वीतील गोकुळेश्वर, खंडाळा डोंगरावरील रामधर्णेश्वर, चौल येथील कुंडेश्वर, रामराज विभागातील ताजपूर येथील पिंपळेश्वर, गोरेगाव येथील त्र्यंबकेश्वर, पेणचे पाटणेश्वर, महलमिरा डोंगरावरील व्याघ्रेश्वर, महाड येथील श्री वीरेश्वर मंदिरात भाविकांनी शिविलगाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या.
रायगड जिल्ह्याचा सांस्कृतिक मानबिंदू ठरलेल्या छबिना उत्सवाला एकादशीपासून सुरूवात झाली. वीरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिरात ओम नम:शिवाय, हर...हर... महादेवचा गजर सतत सुरू होता. मंदिरांबाहेर पूजेचे साहित्य व प्रसादाचे विक्रीसाठीचे छोटे स्टॅल्स ही ठेवण्यात आले होते.
महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये पूजन, भजन, कीर्तन, आर्केस्ट्रा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर काही संस्थांनी सामाजिक उप्रकमही राबवले होते. तर येणाऱ्या भक्तांना देवस्थान ट्रस्ट करून उपवासाच्या अल्पोपहाराचे वाटप हि करण्यात आले होते.
रायगड जिल्ह्यात महाशिवरात्री निमित्ताने निघणाऱ्या पालखी कार्यक्रमात कोणताही गोलबोट लागू नये यासाठी जिल्ह्यात पोलिस ठाणेअंतर्गत पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांनी आपली कामगीरी चोख पणे पार पाडल्यामुळे जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.