मोटारसायकल दोनशे फूट दरीत कोसळली; शिवजयंतीसाठी रायगडावर निघालेले तिघेही वाचले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 04:27 PM2022-02-19T16:27:23+5:302022-02-19T16:29:26+5:30
तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात तरुणांना यश
- सिकंदर अनवारे
महाड शिवजयंती निमित्त किल्ले रायगडवर भोर येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगडच्या दिशेने ट्रिपल सीट निघालेल्या तरुणांची मोटारसायकल माझेरी घाटात सुमारे २०० फुट दरीत कोसळली. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. दरीत कोसळलेल्या तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिक तरुणांना यश आले आहे.
महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोंगवली ता. भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवरून एक गट निघाला होता. त्यातील एका मोटारसायकलवर असलेल्या केतन देसाई 23, प्रथमेश गरुड, 25 आणि किरण सुर्यवंशी 20 यांची मोटारसायकल माझेरी घाटात खोल दरीत कोसळली. सुमारे दोनशे फुट खोल दरीत कोसळल्याने जखमी झालेल्या तरुणांना बाहेर काढणे एक आव्हानच होते. मात्र स्थानिक तरुणांनी अथक प्रयत्न करत तीघांना सुखरूप बाहेर काढले. पैकी दोन जखमींना महाडच्या ग्रामीण रूगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. प्रथमेश किरकाेळ जखमी झाला. त्याला उपचार करुन साेडण्यात आले. पहाटेच्या सुमारास घाटाचा अंदाज न आल्याने तिघेही दरीत कोसळले.
वरंध येथील पत्रकार विपुल देशमुख यांनी पारमाची / माझेरी पोलीस पाटील यांचा संपर्क क्रमांक त्यांचे लहान बंधू भुपेंद्र सकपाळ यांचेकडून पुणे येथून मिळवला आणि पोलीस पाटील नितीन सकपाळ यांना सदर अपघाताची माहिती दिली. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत महाड औद्योगिक पोलीस ठाण्याला खबर दिली. या जखमी तरुणांना वाचवण्यासाठी पारमाची, वरंध, माझेरी आणि उंबर्डे मधील तरुण आणि ग्रामस्थ तसेच सर्व ट्रक चालक यांनी अथक मेहनत घेतली. तरुण समाजसेवक नागेश (उत्तम) देशमुख वरंध आणि समीर सुतार पारमाचीवाडी या दोन तरुणांनी देखील जीवाची बाजी लावून जखमी तरुणांचे प्राण वाचवण्यासाठी मदत केली.