अलिबाग : ख्रिसमस साजरी करण्यासाठी व पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटन केद्रांवर हाऊसफुलचे बोर्ड लागले आहेत. या संधीचा फायदा घेऊन हाॅटेल व्यावसायीकांनीही आकर्षक पॅकेज आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
रायगड मधील अलिबाग, मुरुड, काशिद, किहीम, हरीहरेश्वर, माथेरान, कर्नाळा अभयारण्य अशा आदी ठिकाणी पर्यटक दाखल झाले आहेत. अलिबाग आणि मुरुड परीसरात गेल्या चार दिवसात 50 ते 70 हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. दिवाळी सुटीपासूनच पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु सध्या थंडीचा मोसम आणि सलग सुटय़ा असल्याने पर्यटक मोठय़ा संख्येने रायगडच्या किनारपट्टीवर दाखल झालेत. त्यामुळे इथल्या व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आलेत. हॉटेल, लॉजिंगचा व्यवसायही तेजीत आहे. घोडागाडीवाले, विविध प्रकारचे वॉटरस्पोर्ट्स यांचा व्यवसाय करणारे खूश आहेत. इथल्या लॉजेसनाही चांगला व्यवसाय यानिमित्ताने उपलब्ध झाला आहे.
किनारपट्टीबरोबरच रायगड किल्ला, महड, पाली येथील अष्टविनायकांची मंदिरे, साळाव येथील बिर्ला गणेश मंदिराचा परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे. रायगडमध्ये दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. आताच्या मोसमात पर्यटकांचा हा ओघ नवीन वर्षांच्या स्वागतापर्यंत असाच कायम राहणार आहे. नाताळच्या सुट्टीमुळे व पुढे चार दिवसांनी थर्टीफस्ट सेलिब्रेशनसाठीया ठिकाणांवर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हाॅटेल व्यावसायीकांनीही आकर्षक पॅकेज आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. डिस्को, डिस्कोथेकची सोय पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. याबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षीततेसाठी समुद्र किनाऱ्यांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर पोलिस मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
अतीउत्साही आणि मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. उघड्यावर मद्यपान करण्यावरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. महत्वाच्या नाक्यांवर प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच आपल्या अतिउत्साही जल्लोषाने दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे अवाहन पोलिसांनी केले आहे.
जिल्ह्यात आज पासून साधारणत: 7 दिवस वास्तव्यास असणार आहेत. या दरम्यान पर्यटकांना वाहतूकीच्या समस्येपासून सुटकारा मिळण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी पथक तयार करण्यात आली असून पोलिस यंत्रणेचा कटाक्ष असणार आहे. तर बल्लाळेश्वर व वरद-विनायकाचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.