महाड : ऐतिहासिक किल्ले रायगड परिसर डोंगर आणि घनदाट जंगलाने पसरलेला आहे. या परिसरात अनेक गावे वसलेली आहेत. किल्ल्याच्या पायथ्याजवळ असलेल्या बावले गावात शेतजमिनींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
या भेगा पडल्या असल्याचे शुक्रवारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही माहिती मिळताच, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच ग्रामस्थांचे त्या ठिकाणाहून स्थलांतर करण्यात आले आहे. गेले दोन दिवस महाड तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या बावले गावाच्या शेजारी असलेल्या डोंगर भागाला आणि श्रीमती शेवंताबाई कडू यांच्या ओसाड असलेल्या जमिनीला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचे शुक्रवारी आढळून आले. त्याच गावातील चंद्रकांत महाडिक हे रानामध्ये गेले असता, जमिनीच्या भेगा प्रत्यक्ष पाहताच, ते देखील भयभीत झाले, कडू यांच्या जमिनीला प्रचंड भेगा पडल्याचे समजतात, हा प्रकार त्यांनी ग्रामस्थांना सांगितला.
या घटनेची माहिती महाड महसूल प्रशासनाला मिळताच, तहसीलदार सुरेश काशीद, नायब तहसीलदार प्रदीप कुडाळ, डीवायएसपी नीलेश तांबे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या गावामध्ये ७३ नागरिक राहतात. या सर्व नागरिकांचे गावात असलेल्या शाळा आणि मंदिरामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.
या गावांना दरडीचा धोकामहाड तालुक्यातील अनेक गावांना दरडीचा धोका कायम आहे. वरंधा घाटातील माझेरी, रामदास पठार, आंबे शिवथर, कुंभेशिवथर, पारमाची, तसेच किल्ले रायगड परिसरातील कावले, बावले सांदोशी, करमर, आमडोशी, पुनाडे, नेवाळेवाडी इत्यादी पायथ्याजवळ असलेल्या गावांना दरडी कोसळण्याचा धोका आहे.
गावाशेजारी वरच्या बाजूला डोंगरी भाग आणि शेतजमिनीला काही प्रमाणात भेगा पडल्या आहेत. या गावामध्ये ७३ लोक राहत आहेत .धोका लक्षात घेता, गावाशेजारी असलेल्या शाळा आणि मंदिरामध्ये या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. - प्रदीप कुडाळ, नायब तहसीलदार, महाड.