अलिबाग - गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या स्थितीमुळे जिल्ह्यातील भाताचे पीक धोक्यात आले होते. आज पाऊस बरसला आहे. त्यामुळे किमान आठवडा भरासाठी भात पिकाला कोणताही धोका राहणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता काही कालावधीसाठी मिटली आहे.
यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती. त्यानंतर पावसाने जोरदार बॅटिंग केली होती. सततच्या बरसणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहात असल्याने 95 हजार हेक्टरवरील पिक खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मोठ्या मेहनतीने लावले पिक हातून जाणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती.
कालांतराने पावसाने विसावा घेतल्याने पीक काही प्रमाणात वाचण्यास मदत झाली. त्यानंतर पावसाने एकदम दडी मारली. भाताचे पीक शेतात उभे राहीले होते. एकीकडे पावसाने बरसने थांबवले, तर दुसरीकडे उन्हाच्या तडाख्याने पुन्हा पिकाला धोका निर्माण झाला होता. कडक उन्हामुळे पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत होता. पोलादपूर तालुक्यात असा प्रकार समोर आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी विभागाची देखील चिंता वाढली होती. कृषी विभागाने पिकांवर तातडीने औषध फवारणीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शेतकऱ्यांनी औषध फवारणीला सुरुवात केली होती. जिल्ह्यात अशी परिस्थिती उद्भवण्याआधीच कृषी विभागाने सर्वांनाच सर्तक केले.
पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. पुढील एक आठवडा तरी पिकाला धोका पोचणार सुरुवातीला पावसाला उशीराने सुरुवात झाली. त्यानंतर तो जोरदार बरसला. नंतर अचानक गायब झाला. या लहरी हवामानाचा फटका शेतीला बसत आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी स्थानिक पातळीवरील कृषी विभागाच्या संपर्कात राहावे.- उज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी.