उरण तालुक्यात १७ पैकी १२ ग्रामपंचायतींवर महाआघाडीचा अन् ५ ग्रामपंचायतींवर भाजपाचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 05:47 PM2022-12-20T17:47:50+5:302022-12-20T17:48:08+5:30
उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत.
- मधुकर ठाकूर
उरण : उरण तालुक्यातील १७ पैकी ११ ग्रामपंचायतींवर महाआघाडीचे सरपंच विजयी झाले असून त्यापैकी ८ सरपंच उध्दव ठाकरे गटाचे निवडून आले असल्याची माहिती सेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी दिली.तर भाजप आघाडीचे सात ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडून आले असल्याचा दावा भाजप शहराध्यक्ष कौशिक शहा यांनी केला आहे.
उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी निवडणूकांची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी १२ ग्रामपंचायतींवर महाआघाडीचे सरपंच विजयी झाले आहेत.यामध्ये पुनाडे,वशेणी, कळंबुसरे,नवीन शेवा, पागोटे, जसखार आदी ७ ग्रामपंचायतींवर सेनेचे (उध्दव ठाकरे गट) उमेदवार सरपंचपदी विराजमान झाले दावा सेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांन माहिती देताना केला आहे. तर पाणजे,पिरकोन,धुतुम आदी ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस आघाडीचे सरपंच निवडून आले असल्याचा दावा उरण तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी केला आहे.
शेकापनेही चिर्ले व बोकडवीरा ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदी शेकाप,सेना, कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा शेकाप तालुका चिटणीस विकास नाईक यांनी केला आहे.भाजपने सारडे,रानसई,भेंडखळ, डोंगरी,करळ या पाच ग्रामपंचायतींमध्ये आपल्याच पक्षाचे सरपंच निवडून आले असून पिरकोन,जसखार या दोन ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदी भाजप सहकारी आघाडीचे उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा भाजप शहराध्यक्ष कौशिक शहा यांनी केला आहे. महाआघाडी आणि भाजप सहकारी पक्षाकडून केले जात असलेल्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान मतमोजणीत पाणजे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील सदस्य पदासाठी दोन सदस्यांना समान मते मिळाल्याने पेच निर्माण झाला होता.मात्र शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या चिठ्ठीनंतर विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. डोंगरी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या उमेदवाराचा अवघ्या चार मतांनी पराभव पत्करावा लागला.शांततेत मतमोजणी पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी दरम्यान न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे,उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील जातीने लक्ष घालून गस्तीची पाहणी करीत होते.कर्मचाऱ्यांना सुचनाही करीत होते.
नाव. उमेदवाराचे नाव मते
पाणजे - लखपती हसुराम पाटील ४२९
डोंगरी- संकेत दिलीप घरत ५४६
रानसई - राधा मधुकर पारधी ४९२
पुनाडे- निलेश अनंता कातकरी ४५८
सारडे- रोशन पाटील पांडुरंग ५७९
नवीन शेवा-. सोनल निलेश घरत ८८०
धुतुम- सुचिता प्रेमनाथ ठाकूर ९४०
करळ- अनिता अरविंद तांडेल ३५५
कळंबुसरे- उर्मिला निनाद नाईक ९३८
बोकडविरा- अपर्णा मनोज पाटील ८२९
वशेणी- अनामिक हितेंद्र म्हात्रे १४८८
पागोटे- कुणाल अरुण पाटील ६९५
पिरकोन- कलावती काशिनाथ पाटील १३९९
जसखार- काशिबाई हसुराम ठाकूर ९२८
चिर्ले - सुधाकर भाऊ पाटील १३२१
भेंडखळ- मंजीता मिलिंद पाटील ७९९
नवघर - सविता नितीन मढवी १०२५