कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते उद्घाटन
By निखिल म्हात्रे | Published: November 22, 2023 06:59 PM2023-11-22T18:59:35+5:302023-11-22T18:59:45+5:30
रायगड विभाग गेली तीन वर्षे अव्वल राहिला आहे, त्याबद्दलही तटकरे यांनी रायगड पोलीस विभागाचे अभिनंदन करून सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
अलिबाग - रायगड पोलीस विभागातर्फे आयोजित 48 व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा आैपचारिक उद्घाटन समारंभ बुधवारी (22 नोव्हेंबर रोजी) राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सायंकाळी 4 वाजता येथील पोलीस मुख्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पोलीस आणि खेळाचे अतुट नाते आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणे महत्वाचे आहे. राज्याची महिला व बावविकास मंत्री म्हणून सर्व पोलीस ठाण्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केले.
या उद्घाटन समारंभास जिल्हाधिकारी योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भरत बास्टेवाड, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, रघुजीराजे आंग्रे आदी उपस्थित मान्यवर उपस्थित होते.
48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा सोमवारपासून अलिबागमध्ये सुरू झाली असून आज बुधवारी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन झाले. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आदिती तटकरे म्हणाल्या की, पोलीस आणि क्रीडा क्षेत्र यांचे अतुट नाते आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेपासून कर्मचाऱ्यांचा मैदानाशी संबंध येतो. कर्तव्य बजावताना आपली खेळाची आवड जोपासणे, काैटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे आणि शारीरिकदृष्टया तंदुरुस्त राहण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची ही धडपड काैतुकास्पद आहे. पोलिसांच्या मागील स्पर्धेत रायगड विभागाला विजेते पद मिळाल्याने यावर्षी रायगडकडे यजमान पद आले आहे. रायगड विभाग गेली तीन वर्षे अव्वल राहिला आहे, त्याबद्दलही तटकरे यांनी रायगड पोलीस विभागाचे अभिनंदन करून सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले. या समारंभास पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, खेडाळू, पंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या स्पर्धेत नवी मुंबई आयुक्तालय, मिरा भाईंदर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर पोलीस विभागाचे संघ सहभागी झाले आहेत.