अलिबाग : न्यायालयात दाखलपूर्व वैवाहिक वाद प्रकरणे मध्यस्थी केंद्रामार्फत तडजोडीने मिटविण्यासाठी असणाऱ्या मोफत सेवेची माहिती सर्वसामान्य जनतेला द्यावी तसेच या मोफत सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी मंगळवारी केले.
रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग कार्यालयाकरिता दाखलपूर्व वैवाहिक वाद प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी मध्यस्थी केंद्राचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यापूर्वी दाखलपूर्व वैवाहिक वाद प्रकरणे, घटस्फोट, पोटगी, कौटुंबिक हिंसाचार,वैवाहिक वाद आदी प्रकरणे न्यायालयात दाखल झाल्यानंतर मध्यस्थीकडे पाठविली जात होती, परंतु आता यापुढे ही प्रकरणे न्यायालयात दाखल होण्यापूर्वी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत मध्यस्थी केंद्राच्या मार्फत सोडविण्याची मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी मध्यस्थी केंद्रामध्ये दोन प्रकरणांची नोंद घेण्यात आली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते, वकील संघटना अध्यक्ष अॅड. प्रवीण ठाकूर, न्यायिक अधिकारी, वकील आदी उपस्थित होते.