आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या हट्टाखातर अपुऱ्या अवस्थेत असणाऱ्या क्रीडा संकुलाचे उद््घाटन मुख्यमंत्र्यांनी केल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होत होती.महत्त्वाचे म्हणजे दस्तुरखुद्द क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनीच संकुलाचे काम अद्याप बाकी असल्याची कबुली आपल्या भाषणात दिल्याने कार्यक्रमस्थळी होत असलेल्या चर्चेला बळकटी प्राप्त होत असल्याचे स्प्ष्ट झाले.राज्य सरकारच्या २००१ च्या क्रीडा धोरणानुसार राज्यात विभागीय, जिल्हा, तालुका स्तरावर क्रीडा संकुलाची उभारणी करण्याची योजना कार्यान्वित झाली होती. यासाठी अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे १० एकर जागेमध्ये उभारण्यात आलेल्या जिल्हा क्रीडा संकुलासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती.इनडोअर हॉल, मल्टीजीम, खुले प्रेक्षागृह, वसतिगृह, जलतरण तलाव, ४०० मीटरचा जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते आणि पार्किंग, विविध खेळांची मैदाने, कृत्रिम चढाई भिंत, कबड्डी मॅट, खो-खो मॅट, लॉन टेनिस कोर्ट, ज्युडो मॅट अशा विविध खेळाच्या मैदानांचा समावेश होता. जिल्हा क्रीडा संकुलात यासर्व बाबींपैकी काहींचीच पूर्तता झाली आहे.जिल्हा क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झाले नसतानाच जिल्हा क्रीडा अधिकारी सुनिता रिकामे यांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाचाघाट घातला. जिल्हाधिकारी सुमंत भांगे हे क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे भांगे यांनी संकुलाचे उद्घाटन दोन महिन्यांनंतर योजल्याचेही बोलले जाते. २१ मे २०१५ रोजी सुनिता रिकामे यांनी असाच उद्घाटनाचा घाट घातला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याने तो बारगळला होता.सध्या संकुलात पाण्याचा थेंबही नाही. पाणीपुरवठ्यासाठी एक कोटी ९० लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे पाणीपुरवठ्याचे पाइप मैदानात तसेच पडून आहेत. अंतर्गत रस्त्यासाठीही ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत. मात्र अद्याप कामाचा पत्ताच नाही. इनडोअर हॉलमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला.काम लवकरच पूर्ण होणार> २०१२ पासून संकुलाचे भूमिपूजन करावयाचे होते. जी कामे अपुरी आहेत, ती लवकरच पूर्ण केली जातील. पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तोपर्यंत जलतरण तलाव बंद राहील. > सिंथेटीक जॉगिंग ट्रॅकचेही काम लवकरच करण्यात येईल. क्रीडा संकुल सर्वांसाठी मोफत दिले जाणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनिता रिकामे यांनी सांगितले.खेळायला प्राधान्य द्यायचे असेल, तर आधी चांगल्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षणाबरोबरच खेळामध्ये करिअर करण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. क्रीडा खेळांमुळे खिलाडूवृत्ती निर्माण होते आणि ती राष्ट्रहितासाठी महत्त्वाची आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीक्रीडा संकुलाचे काम बाकी आहे. ते लवकरच पूर्ण करण्यात येईल.क्रीडा संकुलाच्या देखरेखीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. त्यासाठी केअर टेकर पॉलिसी राबविण्याचा विचार आहे. २०२० पर्यंत राज्यातील चांगले खेळाडू निर्माण करण्यावर भर देणार आहे. - विनोद तावडे, शालेय शिक्षण, क्रीडा मंत्रीजिल्हा क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च अवजड उद्योग मंत्रालय उचलणार असल्याने कोणीच काळजी करू नका. जिल्ह्यात कलाकार, खेळाडूंची उणीव नाही, तर त्यांना प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. - अनंत गीते, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री
अपु-या क्रीडा संकुलाचे उद्घाटन
By admin | Published: June 08, 2015 2:18 AM