अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांचे समावेशन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:51 AM2017-08-01T02:51:56+5:302017-08-01T02:51:56+5:30
राज्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत अस्थायी बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी अविरत सेवा देत आहेत.
म्हसळा : राज्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत अस्थायी बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी अविरत सेवा देत आहेत. या अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांचे सेवा समावेशन करावे व स्थायी बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकाºयांचे जिल्हा तांत्रिक संवर्ग गट ‘ब’ यांना गट ‘अ’ परिपत्रक निर्गमित करणे या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मॅग्मो आयुर्वेद संघटनेकडून मुंबईतील आझाद मैदान येथे मंगळवारपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सेवेमध्ये आज शासकीय पातळीवर वेतनवाढ, पदव्युत्तर शिक्षण, सीईटी परीक्षेत गुण वाढविणे, सरळ स्थायी नियुक्ती, जिल्हा पातळीवर नियुक्ती आदी विविध प्रकारचे प्रयत्न करून देखील एम.बी.बी.एस. अर्हताधारक शासकीय सेवेत येण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे आजपर्यंत वैद्यकीय अधिकारी म्हणून कित्येक पदे रिक्त आहेत. ग्रामीण, आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एकूण ७८९ बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी गेल्या १०-१२ वर्षांपासून अस्थायी स्वरूपात काम करीत आहेत. तरीसुद्धा शासन स्तरावरून या वैद्यकीय अधिकाºयांना कोणतेही लाभ मिळत नाहीत. शासकीय सेवेत कार्यरत असताना १२ बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकाºयांचा मृत्यू झाला आहे. परंतु शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना काहीही मदत मिळालेली नाही. त्वरित या अस्थायी बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकाºयांचे सेवा समावेशन व्हावे या मागणीसोबतच जे बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी(जिल्हा तांत्रिक संवर्ग व राज्य संवर्ग ) गट-ब सेवेत स्थायी आहेत यांना देखील कित्येक वेळा आश्वासन देऊन देखील गट-ब मधून गट-अ करणेबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले नाही. हे परिपत्रक तत्काळ निर्गमित करावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी २९ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य मॅग्मो आयुर्वेद संघटनेकडून महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांना याबाबतचे निवेदन महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी देण्यात आलेले आहे. जर या मागण्यांचा विचार महाराष्ट्र शासनाकडून झाला नाही तर १ ते १० आॅगस्ट या कालावधीत आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य मॅग्मो आयुर्वेद संघटनेकडून लक्षवेधी साखळी उपोषण करण्यात येईल असे या निवेदनात नमूद केले होते.