आविष्कार देसाईरायगड : जिल्हा सरकारी रुग्णालयात दरराेज मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. निकृष्ट जेवण, कालबाह्य औषधे, मृतदेहांच्या साठ्यातच अन्य रुग्णांवर सुरू असणारे उपचार या सर्व प्रकारामुळे आराेग्य व्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघत आहेत. आराेग्य व्यवस्थेच्या ढिसाळ आणि निगरगट्ट व्यवस्थापनामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून चांगलाच संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आराेग्य यंत्रणा तातडीने सुधारावी, यासाठी नागरिकांचा राजकीय नेत्यांवर दबाव वाढत आहे.
जिल्हा सरकारी रुग्णालय आणि जिजामाता रुग्णालयात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आराेग्य व्यवस्थेवरील ताण वाढत आहे, हे काेणीच नाकारू शकणार नाही; मात्र याेग्य नियाेजन करून रुग्णांना सेवा कशी देता येईल, याकडे काेणत्याच यंत्रणेचे लक्ष नसल्याचे दिसून येते. यातील गंभीर बाब म्हणजे मृत पावलेल्या रुग्णांच्या सान्निध्यातच रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. समाेर मृतदेह बघून इतर रुग्णांनाही चांगलाच घाम फुटत आहे. त्यामुळे मृतांच्या पडलेल्या खचामधून आम्हाला दुसऱ्या वाॅर्डमध्ये शिफ्ट करा, अशी मागणी रुग्ण त्यांच्या नातेवाईकांकडे करत आहेत. आराेग्य यंत्रणा कशी कुचकामी ठरत आहे, हेच यातून अधाेरेखित हाेत आहे.
जिल्ह्यात सातत्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. वाढणाऱ्या आकड्यामुळे सर्वांच्या उरामध्ये धडकी भरत आहे. वाढणारे रुग्ण आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेली आराेग्य व्यवस्था पुरती काेलमडून पडली आहे. रुग्णालयामध्ये काेणाचाच काेणाला ताळमेळ नसल्याचे चित्र आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही, रुग्णांना देण्यात येणारे जेवण निकृष्ट दर्जाचे आहे, रुग्णांच्या नातेवाईकांनी जेवण दिले, तर नियम आडवे येत आहेत. त्यामुळे रुग्ण बरा हाेण्याऐवजी त्यांची प्रकृती अजून खालावत असल्याचा आराेप सातत्याने हाेत आहे.
उपचारादरम्यान रुग्ण दगावल्यावर त्याचा मृतदेह तासनतास वाॅर्डमध्येच ठेवण्यात येताे. झाेपेचे साेंग घेतलेल्या आराेग्य यंत्रणेला जागे केल्यावर बऱ्याच अवधीनंतर ते वाॅर्डमध्ये येतात. त्यानंतर वाॅर्डमध्ये मृतदेह बॅगेमध्ये भरण्यात येताे. हे सर्व दृश्य उघड्या डाेळ्यांनी वाॅर्डमधील अन्य रुग्ण बघत असतात. त्यामुळे त्यांच्या उरात चांगलीच धडकी भरते. मी तुमच्या पाया पडताे, आम्हाला या वाॅर्डमधून तातडीने दुसऱ्या वाॅर्डमध्ये शिफ्ट करा, अशी विनंती उपचार घेणारे रुग्ण आपल्या नातेवाईकांना करत आहेत.
जिल्हा सरकारी रुग्णालय आणि जिजामाता रुग्णालयात सुरू असलेल्या सावळ्या गाेंधळाबाबत जिल्हा शल्यचिकित्सक मूग गिळून गप्प का बसेल आहेत, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. त्यानुसार राजकीय नेते संबंधित यंत्रणेपुढे मांडत आहेत, परंतु आराेग्य यंत्रणेमध्ये काेणतीच सुधारणा हाेताना दिसत नाही. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुहास माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ताे हाेऊ शकला नाही.