पीएलसीच्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाच्या शाळांच्या यादीत उरणच्या भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 01:00 PM2023-10-10T13:00:59+5:302023-10-10T13:01:22+5:30
प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा होता.
मधुकर ठाकूर
उरण : पीएलसीच्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्वोत्तम १०० शाळांच्या यादीत उरण येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीमती. भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाचा समावेश आहे.या प्रकल्पात राज्यातील ६४,१९८ शाळा सहभागी झालेल्या होत्या.या शाळांमध्ये प्रभावी कामगिरी नोंदवणाऱ्या उरण येथील विद्यालयाचे कौतुक केले जात आहे.
प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा होता.
प्रकल्पात सहभागी होणारे विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे किंवा संदेश देणारे दूत नसून कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्य मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांने केला होता. ६४ हजारांहून अधिक शाळांची सहभागाची नोंदणी झाली होती. विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि बेफिकीर थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देत होते. विद्यार्थ्यांने "गांधीगिरी" करत इतरांने केलेली घाण साफ करणे अपेक्षित नसून घाण करणाऱ्यालाच साफ करायला विनंती करणे अपेक्षित होते. घटनेचे विवरण सांगताना व्हिडिओ करून सोशल मीडियाला शेअर केले जातात.
पहिल्या टप्प्यात असे १५ लाखाहुन अधिक विडिओ शेअर झाले आहेत. या संकल्पनेला गती मिळाल्याने “दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. ठिकठिकाणी प्रत्येक चुकीला कोणी ना कोणी चुक दाखवून दिली तरच जास्तीत जास्त नागरिक जागरूक होतील आणि महाराष्ट्र निष्काळजी मुक्त बनेल” अशी माहिती प्रकल्प संचालक रोहित आर्या ने दिली. पहिल्या टप्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत ६४ हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी १०० शाळांचे कौतुक आणि सत्कारही मुंबई येथे एका कार्यक्रमात केला जाणार आहे.
श्रीमती. भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागो जागी बेफिकीर लोकांना थांबवण्यास प्रोत्साहित केले. तर शाळा समन्वयक अंकिता पाटील, कु. सोफिया शेख, आणि सर्व वर्ग शिक्षिका नियमित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांचे अनुभव ऐकून त्यांना मार्गदर्शनही केले. विद्यालयाच्या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर ,व्हॉईस चेअरमन . वाय. टी.देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.