नांदगाव/ मुरु ड : मुरु ड- धुळे एस.टी सेवा १६ जानेवारीपासून तडका फडकी बंद केल्यामुळे खांदेशात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सुरु असलेली प्रवासी सेवा महामंडळातर्फे खंडीत केल्याने मुरु ड सह अलिबाग तालुक्यातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद असणाऱ्या महामंडळाने प्रवासी वाढवा अभियान काळात हा अप्रिय निर्णय मागे घेऊन मुरु ड -धुळे ही सेवा पूर्ववत करावी अशी मागणी मुरूड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी केली आहे.माजी आमदार मिनाक्षी पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून मरुड-धुळे बस सुरु करण्यात आली होती. मुरुडसह जे.एस.डब्लू साळाव कंपनीतील कर्मचारी, शासकीय नोकरदार, व्यावसायिक आदींसाठी ही एसटी अत्यंत उपयुक्त होती. लांब पल्ल्याची ही एसटी प्रती दिन ३० ते ३२ हजार रुपयांचे उत्पन्न आणत होती. एस.टी. महामंडळाला खाजगी समांतर प्रवासी वाहतूक सेवेचे वाढते आव्हान दिवसें दिवस डोकेदुखी ठरू पहात आहे. त्यातूनच असे निर्णय घेतल्यानंतर प्रवाशी खाजगी वाहतूक सेवेकडे जाणार हे निश्चित. या संदर्भात मुरूडचे आगार व्यवस्थापक तेजस गायकवाड यांना विचारणा केली असता मुरु ड-धुळे तसेच मुरु ड-शिर्डी या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय विभागीय पातळीवर घेतला आहे. बस सेवा पूर्ववत करण्याचा सर्वस्वी निर्णय वरिष्ठांचा आहे असे गायकवाड म्हणाले.पारोळा येथील प्रदीप निंबाजी महाजन कुटुंबासह धुळे बसने मुरु ड ला नातेवाईकांना भेटायला आले असता ही एसटी अचानक बंद केल्याने महाजन परिवाराची गैरसोय झाल्याचे त्यांनी सांगितले. मुरु ड हे पर्यटन केंद्र असल्यामुळे धुळे, मालेगाव ,नंदूरबार, सटाणा या भागातील सर्व सामान्य हौशी पर्यटकांची गैरसोय झाल्याची भावना त्यांनी बोलुन दाखवली.महत्वाचे म्हणजे खांदेशी मंडळींना कोकणात येण्याची संधी महामंडळाने न डावलता ही बस सेवा पूर्ववत करावी अशी मागणी प्रवाशी करीत आहेत. (वार्ताहर)
मुरु ड-धुळे एसटी बंद झाल्याने गैरसोय
By admin | Published: January 24, 2017 5:55 AM