जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची गैरसोय, किनारे गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 01:00 AM2020-12-26T01:00:33+5:302020-12-26T01:01:01+5:30
Janjira fort : दिघी व राजपुरी येथून जंजिरा किल्ल्यावर सुट्यांच्या दिवशी शेकडो पर्यटक जात असतात. त्यात वृद्ध, महिला व बालकांचादेखील समावेश असतो.
- गणेश प्रभाळे
दिघी : नववर्षाच्या स्वागताला पर्यटकांची रेलचेल आतापासूनच सुरू झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, हरिहरेश्वरसोबत पाण्यातील किल्ला जंजिरा पाहण्याचा बेत करत अनेक पर्यटकांची या आठवड्यापासूनच गर्दी दिसून आली. बऱ्याच कालावधीनंतर येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजू लागले आहेत. येथील जंजिरा किल्ल्यावरदेखील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, किल्ल्यात जाण्यासाठी शिडांच्या बोटीतून उतरताना पर्यटकांची गैरसोय होत असून जीवाशी खेळ सुरू आहे.
दिघी व राजपुरी येथून जंजिरा किल्ल्यावर सुट्यांच्या दिवशी शेकडो पर्यटक जात असतात. त्यात वृद्ध, महिला व बालकांचादेखील समावेश असतो. राजपुरी किंवा दिघी येथून पर्यटकांना मेकॅनिक बोटीमधून बसून किल्ल्यानजीक आणले जाते व किल्ल्यानजीक शिडांच्या वेगळ्या होडींमधून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ नेले जाते. जंजिरा किल्ल्यात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ पायऱ्या आहेत. या पायऱ्यांलगतच शिडांच्या होडीतून उतरून किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. मात्र, किल्ल्यालगत कोणताही धक्का नसल्याने वृद्ध, महिला व बालकांना उतरण्यास त्रास होतो. बोटींवर असलेले स्थानिक तरुण हात देऊन पर्यटकांना बोटींतून उतरण्यास व चढण्यास मदत करतात. मात्र, लाटांचा मारा असल्याने मानवी आधारदेखील कुचकामी ठरतो. बऱ्याच वेळा बोटीतून चढताना अथवा उतरताना पर्यटक पडल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या पर्यटकांना समुद्राचे मोठे अप्रूप असते. अशातच समुद्राच्या अजस्र लाटा पाहून त्यांचे मन थबकते. अचानक समुद्रात पडण्याची भीती त्यांच्या मनावर आघात करण्याची शक्यता नाकारता येत
नाही.
पर्यटकांना पाणी व शौचालय सुविधा हवी
किल्ला बघण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून प्रत्येकी २५ रु. आकारले जातात. मात्र, किल्ल्यात पाणी व अद्ययावत स्वच्छतागृहाची सुविधा नाही. त्याचबरोबर पर्यटकास किल्ल्यासंबंधित हवी असलेली माहिती प्रशिक्षित गाइडकडून मिळावी, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.
जंजिरा किल्ल्याच्या दरवाजापासून ५० मीटरचा जरी धक्का बांधण्यात आला तरी पर्यटकांना चढताना वा उतरताना सोयीचे असेल. यासाठी मालवण किल्ल्याच्या धर्तीवर जेट्टी तयार करण्याबाबत २०१७ साली संघटनेतर्फे पत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप काम झाले नाही .
- श्रीकांत सुर्वे, अध्यक्ष, प्रवासी संघटना
किल्ल्याजवळ बांधण्यात येणाऱ्या जेट्टीसाठी पुरातत्त्व विभागाकडे कागदोपत्री पूर्तता करण्यात आली. मात्र, किल्ल्याजवळ जेट्टी बांधण्यास संबंधित विभागाने काही तांत्रिक कारणास्तव प्रस्ताव थांबवल्याने तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला.
- सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, मेरीटाइम बोर्ड