आगरदांडा : मुरूडपासून हाकेच्या अंतरावर असणारे एकदरा, डोंगरी व राजपुरी या रस्त्यावर असणाऱ्या विद्युत खांबावर स्ट्रीट लाइट नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायतीने वीजपुरवठा करणे क्रमप्राप्त असतानादेखील रस्त्यालगत विजेची सुविधा नसल्याने ग्रामस्थांना रात्री चाचपडत रस्ता शोधावा लागत आहे. राजपुरी व एकदरा ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीमधील रस्त्यावरील दिवे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
एकदरा, डोंगरी, राजपुरी गावातील ग्रामस्थांना संध्याकाळच्या दरम्यान मुरूड शहरात जावयाचे असल्यास त्या वेळी रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. अशा वेळी असंख्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील दिवे लावण्याचे कामसुद्धा ग्रामपंचायतचे असताना दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन रस्त्यावरील दिवे तातडीने लावण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पर्यटकांना त्रासवेलकम सोसायटीचे चेअरमन जावेद कारभारी यांनी सांगितले की, जंजिरा किल्ला पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. जंजिरा किल्ल्यावर जाणारा मार्ग हा राजपुरी व एकदरा ग्रामपंचायतींमधून जात आहे. असे काही प्रसंग घडलेले आहेत की ज्या वेळी पर्यटकांच्या गाडीची लाइट व्यवस्था बिघडून त्यांना याच रस्त्यावर अंधारात राहावे लागले आहे. जर का रस्त्यावरील वीज दिवे असतील तर पर्यटकांप्रमाणे स्थानिक ग्रामस्थांनासुद्धा याचा फायदा होणार आहे.