पनवेलमध्ये वर्षभरात किराणा, भाजीपाला दुकानांत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:22 AM2021-03-31T02:22:29+5:302021-03-31T02:23:01+5:30

गत वर्षापासून कोरोना संसर्गात वाढ होत आहे. त्याचबरोबर गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद झाली आहेत.

Increase in grocery and vegetable shops in Panvel throughout the year | पनवेलमध्ये वर्षभरात किराणा, भाजीपाला दुकानांत वाढ

पनवेलमध्ये वर्षभरात किराणा, भाजीपाला दुकानांत वाढ

Next

कळंबाेली : गत वर्षापासून कोरोना संसर्गात वाढ होत आहे. त्याचबरोबर गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद झाली आहेत. गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन असतानादेखील अत्यावश्यक सेवेतील दुधडेअरी, भाजीपाला, औषधी व किराणा दुकान विक्री करणा-यांची आर्थिक परिस्थिती सुधारली; परंतु इतर व्यवसाय करणारे छोटे-मोठे व्यापारी मात्र आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे इतर व्यवसाय बंद करत दूधडेअरी, भाजीपाला, किराणा,औषधी दुकाने सुरू करण्यावर पनवेल परिसरातील नागरिकांनी भर दिला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, खारघर, खांदा कॉलनी, नवीन पनवेल या परिसरात असणारे छोटे-मोठे व्यवसाय कोरोनामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे आर्थिक बाजू कोलमडल्याने अखेर दुकान बंद करावे लागल्याचे व्यापारी सांगतात. एक तर दुकानातील मालाची विक्री होत नाही. तसेच कोरोना नियमांचे पालन करत लवकर दुकाने बंद करावी लागतात. गतवर्षी लॉकडाऊनमुळे धंद्यात मंदी आली आहे. बहुतांश व्यवसाय अडचणीत सापडून बंद झाले आहेत. बेरोजगारीचे प्रमाणदेखील वाढले आहे. इतर व्यवसाय करावा तर चालत नाही. पुन्हा लॉकडाऊन पडला, तर गाळ्याचे भाडे, मालात गुंतवलेले पैसे कसे काढायचे, हादेखील प्रश्न व्यापा-यांसमोर उभा आहे. लॉकडाऊन तसेच आता कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे आस्थापने नियमानुसार चालवण्यास परवानगी दिली आहे. परंतु व्यवसाय होत नसल्याने अनेक दुकाने बंद झाली आहेत.  

दुकाने वाढण्याची कारणे -
पनवेल परिसरात अत्यावश्यक सेवेतील दुकानात वाढ झाली आहे. ही दुकाने सुरू करण्यासाठी कमी कामगार त्याचबरोबर प्रशिक्षणाची गरज नाही. छोट्या जागेत हा व्यवसाय सुरू करता येतो. कमी भांडवलात व्यवसाय सुरू होतो. कोरोना काळात लॉकडाऊन असो किंवा नसो, दुकान चालूच राहते. फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांचा औषधी दुकान सुरू करण्याकडे अधिक कल आहे. 

कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याची हिम्मतच होत नाही. कोरोनामुळे इतर व्यवसाय चालवणे मुश्किल झाले आहे. अगोदर माझे जनरल स्टोअर्स होते. ते बंद करून यंदा किराणा दुकान सुरू केले. त्यातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी चालतो.    
- आनंद चैरसिया , दुकानदार

Web Title: Increase in grocery and vegetable shops in Panvel throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.