नेरळ : कर्जत तालुक्यातील महत्वाच्या नेरळ -कळंब जिल्हा मार्गावरील दहिवली पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पुलावरून पुराचे पाणी जाऊन रस्ता बंद होतो. सुमारे ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटतो, तसेच पुलावरील रस्त्याची आणि लोखंडी काठड्यांची दुरवस्था होत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक, प्रवाशी तसेच वाहन चालकांकडून केली जात आहे.या पुलासंदर्भात स्थानिकांची मागणी लक्षात घेता बांधकाम विभागाकडून दरवर्षी पुलाची उंची वाढविण्या संदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविला जातो, मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे दरवर्षी या पुलाची दुर्दशा होत असते. तसेच पूल पाण्याखाली गेल्याने ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटतो. याचा मोठ्या प्रमाणात त्रास स्थानिक नागरिक, प्रवासी आणि आजूबाजूच्या नोकरदार, विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
काही वर्षांपूर्वी या पुलाच्या खांबांची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु पुन्हा या पुलाला तडा गेल्याने पुन्हा पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे शासनाने परिसरातील गावांचा विचार करून तात्काळ या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी केली जात आहे.दहिवली पूल गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक बनला आहे. उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जाऊन पुलाची आणि रस्त्याची दुर्दशा होत आहे; त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने जास्त उंचीच्या पुलाची नव्याने उभारणी करावी.- चिंधु तरे,सरपंच,दहिवली ग्रामपंचायतनेरळ- दहिवली पुलावरून दरवर्षी पावसाचे पाणी जाऊन रस्ता खराब होतो, आणि रेलिंग तुटतात. या संदर्भात आम्ही बांधकाम विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात काळवितो.- अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग