रायगड जिल्ह्यात घरफोड्यांत वाढ
By admin | Published: August 11, 2015 12:29 AM2015-08-11T00:29:36+5:302015-08-11T00:29:36+5:30
गेल्या महिनाभरापासून रायगड जिल्ह्यातील गुन्ह्यांत वाढ झालेली असतानाच गेल्या दोन दिवसांपासून रोहा व पेण तालुक्यांत घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. दोन्ही तालुक्यांतील घरफोडींमधील
अलिबाग : गेल्या महिनाभरापासून रायगड जिल्ह्यातील गुन्ह्यांत वाढ झालेली असतानाच गेल्या दोन दिवसांपासून रोहा व पेण तालुक्यांत घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. दोन्ही तालुक्यांतील घरफोडींमधील कार्यपद्धती एकच निष्पन्न होत असल्याने जिल्ह्यात घरफोडी करणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. रोहा तालुक्यात शनिवार-रविवारच्या रात्री तीन घरफोड्या तर तीन घरफोड्यांचा प्रयत्न तर पेण तालुक्यात एक घरफोडी व घरफोडीचा प्रयत्न झाला आहे.
पेण तालुक्यातील नारवेल गावात रविवारी बंद घराचे कुलूप तोडून, कपाटातील एक सोन्याची माळ,एक सोन्याचा सर, घड्याळ व पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण ३५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. तर याच घराच्या शेजारील घराचा कडी कोयंडा तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याचेही निष्पन्न झाले आहे. तर याच गावांतील कोळीवाड्यातील एका हॉटेलमध्ये जेवणाऱ्या नागरिकांची ४८ हजार ८८० रुपयांची रोकड व घड्याळ असलेली काळ्या रंगाची सॅक चोरट्यांनी शेजारुन लंपास केली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पेण पोलीस करीत आहेत. (विशेष प्रतिनिधी)