अलिबाग - गणेशोत्सव अवघ्या पंधरवड्यावर आला असून यंदाच्या उत्सवानिमित्त पर्यावरणपूरक अशा कागदाच्या लगद्याच्या मूर्तीची मागणी वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे. तर, गणेशाच्या मूर्त्यांच्या सजावटीमध्ये देखील वाढ करण्याची मागणी करण्यात येत असून फेटेवाला, शाल आणि धोतर नेसलेल्या मूर्त्यांची मागणी देखील वाढली आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण हे गणेशाच्या मुर्त्या बनविणाऱ्या कलाकारांची महानगरी मानली जाते. वर्षागणिक कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या तालुक्यात पेण शहर, हमरापूर, जोहे, तांबडशेत अशा अनेह गावात लाखो मुर्त्या तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, गेल्या काही वर्षात पीओपीच्या मूर्त्यांवर निर्बंध लावण्यात आल्याने या व्यवसायावर आर्थिक परिणाम झाला होता. तर, पेण येथील गणेशमुर्त्या या राज्यभरात पाठविण्यात येत असून परदेशातून देखील मोठी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, पेण येथील अनेक कारखान्यात यंदा शाडूच्या मातीच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींमध्ये वाढ झाली असल्याचे तरुण कारखानदार गणेश पवार याने म्हटले आहे. यामुळे, त्याने त्यांच्या कारखान्यात ५० टक्के पीओपी आणि शाडू मातीच्या गणपतींची निर्मिती केली असून कागदी लगद्याच्या मूर्त्यांची तयार केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी, गणेश पवार यांच्या कारखान्यात सुमारे १५ हजार गणेशाच्या विविध रूपातील मुर्त्या तयार करण्यात आल्या असून अष्टविनायकाच्या रूपातील गणेश मूर्तीची मागणी असल्याचे सुरेखा पवार यांनी सांगितले आहे. तर, गणेश याच्या कारखान्यात त्यांचे पूर्ण कुटुंब हे मुर्त्या तयार करण्याच्या कामात दंगून गेले असून गेल्या सुमारे ३० वर्षांपासून ते या व्यवसायात असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, यंदाच्या वर्षी अनेक भाविक आणि व्यावसायिकांनी पर्यावरणपूरक आणि वजनाने हलक्या असलेल्या कागदी लगद्याच्या मूर्त्यांची विशेष मागणी केली आहे. यामुळे, शाडूच्या मातीच्या मूर्त्यांच्या खर्चापेक्षा १० टक्के अधिक किंमत असलेल्या कागदी लगद्याच्या सुमारे एक हजार मुर्त्या तयार करण्यात आल्या असल्याचे अंकेश याने सांगितले आहे.
तर, यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त बालगणेश आणि मोत्याच्या रंगाचे गट्टू अशा नवीन मुर्त्या तयार करण्यात आल्या असून त्यांच्या कारखान्यातून मुंबई, ठाणे, पुणे समवेत परदेशातील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथील मुर्त्या पाठविण्यात आला आहेत. तर, गणेश याच्या या कारखान्यात एक फुटापासून चार फुटांपर्यंत उंचीच्या मुर्त्या तयार करण्यात आल्या असून फेटेवाला, शाल परिधान केलेले आणि धोतर - पितांबर नेसलेल्या गणपतींची अधिक मागणी असल्याचे सोनाली पवार यांनी म्हटले आहे. यामुळे, या सजावटीचे काम हे कारखान्यातील महिलावर्ग करीत असल्याचे सांगण्यात आले असून उत्साहात साजरा होणाऱ्या या उत्सवानिमित्त अनेक भाविक हे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यात प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
वजनाने हलक्या असलेल्या कागदी लगद्याच्या मुर्त्या या विसर्जनाला देखील सोयीस्कर असल्याने अनेक भाविक या मूर्त्यांची मागणी करीत आहेत. तर, परदेशात देखील या कागदी लगद्याच्या मूर्त्यांची मागणी वाढली असल्याचे गणेश कला केंद्राच्या गणेश पवार याने म्हटले आहे. तर, यंदाच्या उत्सवानिमित्त पेण तालुक्यात विविध रूपातील सुमारे ३० लाख गणेशमूर्त्या तयार करण्यात आल्या असून यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणे अपेक्षित आहे.