रायगडच्या वनसंपदेत वाढ

By निखिल म्हात्रे | Published: May 27, 2024 10:28 AM2024-05-27T10:28:23+5:302024-05-27T10:29:03+5:30

वनक्षेत्र वाढू लागण्याने या क्षेत्रातून गायब झालेली गिधाडे, गवे, नीलगाय, सांबर, चितळ यांसारख्या प्राण्यांचे पुन्हा आगमन झाले आहे.

increase in forest resources of raigad | रायगडच्या वनसंपदेत वाढ

रायगडच्या वनसंपदेत वाढ

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - जंगलांच्या संरक्षणासाठी वनविभागाकडून होणारे प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील वनक्षेत्रात वाढ झाली आहे. सामाजिक वनीकरण, वनविभागाने सातत्याने राबवलेल्या उपक्रमांमुळे पश्चिम घाटाचा भाग असलेल्या रायगड जिल्ह्यात वृक्षतोडीचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी इमारत आणि स्वयंपाकासाठी 90 टक्के वापर जंगलातील लाकडांचा केला जात होता, आता हे प्रमाण 20 टक्क्यांवर आले आहे. वनक्षेत्र वाढू लागण्याने या क्षेत्रातून गायब झालेली गिधाडे, गवे, नीलगाय, सांबर, चितळ यांसारख्या प्राण्यांचे पुन्हा आगमन झाले आहे.

निसर्गप्रेमी, सर्पमित्र आणि सिस्केपसारख्या वन्यजीव संस्थांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे रायगडमधील चित्र पालटले आहे. पूर्वी मांडूळ, घोरपड, खवलेमांजर यासारख्या सरपटणारे प्राणी तस्करीत सापडून यायचे, आता तस्करीमध्येही घट झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात एकूण 1725.44 चौरस किलोमीटर वनक्षेत्रापैकी 134,65 चौरस किमी क्षेत्र राखीव आहे. यात फणसाड वन्यजीव आणि कर्नाळा पक्षी अभयारण्याचा समावेश होतो. अभयारण्य परिसरातील लोकांमध्ये वृक्षतोडीबाबत झालेली जनजागृती, वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत उपाययोजनांमुळे वन्यप्राण्यांची संख्या तीन वर्षांत 15 टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज आहे.

जंगल वाढल्याने रोजगार उपलब्ध -

माथेरान, कर्नाळा, फणसाड यांसारख्या ठिकाणी विपुल वनसंपदा आहे. हिरवीगार झाडे, विविध प्रजातींच्या पशुपक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यासक, पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे आसपासच्या गावकऱ्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध  झाल्याने वनसंवर्धनाची मानसिकता वाढू लागली आहे. कांदळवन क्षेत्रात उपजिविकेची साधने निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्याचबरोबर रोजगाराची पर्यायी साधने निर्माण झाल्याने आदिवासी लोकांकडून होणारी वृक्षतोड कमी झाल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

विविध सस्तन प्राणी -

रायगड जिल्ह्यातील जंगलात आजमितीस 17 प्रकारच्या सस्तन प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असणारा झुबकेदार शेपूट असणारा राज्यप्राणी शेकरूचे (मोठी खार) दर्शन येथील अभयारण्यात होते. शेकरूची घरटी उंच झाडावर वैशिष्टपूर्ण अशी पानांनी मढलेली असतात. फणसाडमध्ये भल्या पहाटे वा सायंकाळी अभयारण्यातील प्रमुख शिकारी प्राणी, बिबट्याचे दर्शन अनेकदा पर्यटकांना होते. भारतातील सर्वात मोठे हरिण-सांबर व जगातील सर्वात छोटे हरिण-पिसोरी हे दोन्ही याच अभयारण्यात आढळून येतात. एकमेव उडू शकणारा सस्तन प्राणी वटवाघुळाची पॅटेड बॅट या प्रजातीची नोंद याठिकाणी करण्यात आली आहे. याशिवाय रानससा, साळिंदर, रानडुक्कर, मुंगूस, वानर, माकड, रानमांजर, तरस, कोल्हा हे वन्यप्राणीही आढळतात. फणसाड अभयारण्यात गत वर्षांपासून रानगव्यांची संख्या वाढली असून निरीक्षणात साधारण 20 रानगवे आढळले आहेत. जानेवारी 2020 पासून रानकुत्र्यांचीही संख्याही वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कीटक विश्व व अन्य प्राणीसंपदा -

फुलपाखरांच्या 90 हून अधिक प्रजातींची कर्नाळा आणि फणसाड अभयारण्यात नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉनसह भारतातील सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्वेल इथे आढळतात. अभयारण्यात कॉमन मॅप, ग्रेट ऑरेंज टीप, ब्लू ऑक लिफ, कॉमन नबाब, प्लस ज्युडी, सायकी ही फुलपाखरे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात पतंगाच्या विविध प्रजातींचे निरीक्षण सहज होते. सर्पांमध्ये घोरपडीसह हरणटोळ, तस्कर, धामण, अजगर, असे बिनविषारी तर नाग, घोणस, फुरसे, मण्यार, चापडा यांसारखे विषारी सर्प मिळून 27 प्रकारच्या सापांची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: increase in forest resources of raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड