जिल्ह्यात नद्यांच्या पातळीत वाढ
By admin | Published: June 26, 2017 01:39 AM2017-06-26T01:39:54+5:302017-06-26T01:39:54+5:30
रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत एकूण ७३६.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पहाटेपासून अंबा आणि कुंडलिका नद्यांची
जयंत धुळप ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत एकूण ७३६.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पहाटेपासून अंबा आणि कुंडलिका नद्यांची जलपातळी वाढल्याने दोन्ही नदीकिनारच्या १६ गावांतील ग्रामस्थांना सतर्कता व दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अंबा नदीची जलपातळी नागोठणे केटी बंधाऱ्याजवळ ८ मीटर या पूररेषेपेक्षा वाढून ८.५० मीटर झाली आहे. तर कुंडलिका नदीची जलपातळी रोहा येथे २३.९० मीटर झाली आहे. कुंडलिका नदीची रोहा येथील पूरसीमा २३.९५ मीटर आहे. झपाट्याने वाढणाऱ्या जलपातळीच्या पार्श्वभूमीवर रोहा तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याचेही पाठक यांनी सांगितले.
रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून पुढील २४ तासांत संपूर्ण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर सोमवार, २६ जून २०१७ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून पुढील १२० तासांत कोकणातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यात आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचे पाठक यांनी अखेरीस सांगितले.
रविवारीही सकाळपासूनच पावासाने तुफान हजेरी लावल्याने काही क्षणांमध्ये अलिबाग शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. सकाळपासून पाऊस सुरू असल्याने अलिबागच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. सुट्टी असल्याने अलिबागच्या समुद्रकिनारी उंच लाटा पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनी हजेरी लावली होती. दिवसभर ढगाळ वातावरण होते.कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळ गंगा, उल्हास आणि गाढई नदीच्या क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने त्या खळाळून वाहत होत्या. भिरा धरण क्षेत्रामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २१.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर १ जूनपासून २४ जूनपर्यंत ४७७.४० मि.मी. पाऊस पडला आहे. पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी खोळंबलेली कामे सुरू केली आहेत. जिल्ह्यातील २८ लघुपाटबंधारे प्रकल्पातील धरणांमध्ये सरासरी २५.८० दलघमी पाणीसाठा झाला आहे. शनिवारी आणि रविवारी बरसणाऱ्या पावसामुळे अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली होती; परंतु दुपारीच्या कालावधीत पावसाने काही काळ उघडीप दिल्याने ती काही अंशी कमी झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कर्जत तालुक्यामध्ये एक वृक्ष पडला होता. त्याला तातडीने काढण्यात आल्याचेही पाठक यांनी स्पष्ट केले. येत्या २४ तासांमध्ये उत्तर कोकणातील जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २६ जूनच्या सकाळपासूनच धडाकेबाज पावसाला सुरुवात होणार असल्याने खबरदारीच्या उपाययोजना घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी दिल्या आहेत.