- निखिल म्हात्रेअलिबाग : ऐन दिवाळीतही कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे खरेदीदारांमध्ये मंदीचे सावट दिसून येत आहे. त्यातच या वर्षी प्रत्येक वस्तूच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री बसली आहे. त्यामुळे बाजारपेठा जरी सजल्या असल्या तरी ग्राहक मात्र वस्तू खरेदी करण्यासाठी फिरकताना दिसत नाहीत.
यंदा भाववाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणावर कात्री बसत आहे. बाजारात साध्या, रंगकाम न केलेल्या वेगवेगळ्या आकारांतील पणत्या ८ रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत प्रति नग या भावाने बाजारात उपलब्ध आहेत. रंगकाम केलेल्या आकर्षक व कुंदनजडित पणत्या ८० रुपयांपासून १७० रुपयांपर्यंत प्रति डझन या भावाने विक्री होत आहेत. रांगोळ्यांचे स्टीकर, स्वस्तिक व लक्ष्मीची पावले १० ते ३० रुपयांच्या घरात उपलब्ध आहेत.
रांगोळ्यांचे ठसे, रंग भरण्यासाठी जाळीची झाकणे असलेल्या डब्या व रोल यांनाही चांगली मागणी आहे. त्याचबरोबर दारावरील तोरण आणि झुंबरांचेही विविध प्रकार बाजारात पाहावयास मिळत आहेत. विविध रंग आणि रांगोळ्यांमुळे बाजारपेठा अधिकच खुलून दिसत आहेत. रंग ५ रुपये ५० ग्रॅम या किमतीमध्ये तर रांगोळी मिक्स कलरच्या डब्या यंदा १० रुपये किमतीमध्ये उपलब्ध आहेत.रांगोळी पुस्तक १० ते ५० रुपयांपर्यंत असून घरगुती उटणे ५ रुपये पॅकेट प्रमाणे उपलब्ध आहे.