मुरुड, काशीद समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या दुर्घटनांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:20 AM2019-07-01T05:20:23+5:302019-07-01T05:20:37+5:30
मुरुड तालुक्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ-पोफळीच्या बागा, सुरुची वने, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते.
- संजय करडे
मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ-पोफळीच्या बागा, सुरुची वने, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. मात्र उत्साहाच्या भरात सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गेल्या काही वर्षात येथील समुद्रकिनाºयावर बुडून मृत्यू होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
भरती-ओहोटीचे गणित लक्षात न घेतल्यास पर्यटक समुद्रात उतरतात. याठिकाणी लावलेल्या सूचनांकडेही अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मुरुड समुद्रकिनारी जून महिन्यात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. पनवेल तालुक्यातील नावडे येथे राहणारे अभिषेक म्हात्रे (३२) व त्यांच्या समवेत आलेली पूजा अशोक शेट्टी (२८) हे काशीद समुद्रकिनारी पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी उरण तालुक्यातील उलवे येथील महंमद गनी (२५ ) हा तरुण बुडाल्याची घटना घडली.
काशीद समुद्रकिनारी पर्यटकांसाठी सूचना फलक लावण्यात आले आहे. पोलीस तसेच स्थानिकांकडूनही पर्यटकांना वारंवार सूचित केले जाते. मात्र उत्साहाच्या भरात ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. वीकेण्ड, सुटीच्या दिवशी मुंबई, ठाणे, पुणे येथून हजारो पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यासाठी येतात. मात्र उधाणामुळे प्रवाहाचा अंदाज येत नाही आणि बाहेरून येणाºया व्यक्तींना भरती-ओहोटीच्या वेळांचीही माहिती नसल्याने नाहक जीव गमवावा लागतो.
मुरुड बीचवर १९९१ मध्ये महेंद्र अँड महेंद्र कंपनीच्या ७ कामगारांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर ६ जुलै २०१४ रोजी चेंबूर येथील ६ व्यावसायिकांना पोहताना जलसमाधी मिळाली . फेब्रुवारी २०१६ मध्ये सहलीसाठी आलेल्या पुण्यातील आबिदा इनामदार कॉलेजच्या१४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर शालेय सहलींवर एकप्रकार निर्बंध घालण्यात आले होते.
काशीद ग्रामपंचायतीतर्फे बीचवर ठळकपणे खोल समुद्रात पोहणे धोकादायक असल्याचे सूचना फलक लावण्यात आले असले तरी पोलिसांना गुंगारा देऊन पर्यटक खोल समुद्रात जात असल्याने बुडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
- समुद्रकिनारी शनिवार व रविवारी पोलीस बंदोबस्त त्याचप्रमाणे मेरीटाइम बोर्डाकडून सुरक्षा कर्मचारी नेमणे आवश्यक आहे. पावसाळ्यात जलवाहतूक बंद असते, त्याचप्रमाणे पर्यटकांना पोहण्यासही बंदी घालावी अशी मागणी होत आहे. याबाबत मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्याशी संपर्क साधला असता, अनेकदा पर्यटक मद्यपान करून समुद्रात उतरतात. अनेकांना पोहताही येत नसते. उत्साहाच्या भरात ते प्रवाहाबरोबर वाहत जात असल्याचे त्यांनी सांगितले.