दासगाव : राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होताच मतदान शांततेत आणि विनाअडथळा पार पडण्यासाठी प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून जय्यत तयारी केली आहे. १९४ महाड विधानसभा मतदारसंघात मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुका शांततेत आणि निर्भयतेत मतदान व्हावे, शिवाय मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडून मतदानाचा टक्काही वाढवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले आहे.
१९४ महाड विधानसभा मतदारसंघात दोन लाख ८४ हजार ८४२ मतदार असून, नव्याने जवळपास २००० मतदारांची नोंदणी झाली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठी ३७९ मतदान केंद्र असणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाड प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. महाड विधानसभा मतदारसंघात ६१ झोन केले असून, जवळपास १८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
महाड मतदारसंघात ३९ मतदान केंद्रे ही कनेक्टिव्हिटी नसणारी आहेत. या ठिकाणी रनर्स नेमण्यात आले आहेत. महाड मतदारसंघात देशमुख कांबळे या ठिकाणी सखी मतदान केंद्र केले आहे. तर आदर्श मतदान केंद्र म्हणून महाड शहरातील शाळा नंबर ५ ची निवड केली आहे. या मतदारसंघात ३९ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग सुविधा असल्याने निवडणूक निर्णय कार्यालयातून या मतदान केंद्रांवर लक्ष ठेवता येणे शक्य झाले आहे. या प्रक्रियेसाठी जवळपास ४३ बसेस, १६ मिनी बसेस, ९९ जीप अशी वाहनांची सुविधा करण्यात आली आहे. आचारसंहिता भंग होणार नाही, याकरिता स्थिर सर्व्हेक्षणाद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. महाडमध्ये मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान शांततेत पार पडून मतदारांनी निर्भयपणे मतदान करून आपला हक्क बजावण्यासाठी बाहेर पडले पाहिजे, असे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले.
१या निवडणुकीमध्ये अपंगांनाही विनासायास मतदान करता यावे, याकरिता सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. महाड तालुक्यांमध्ये अपंगांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता प्रशासनाने अपंगांसाठी विविध साधने, वाहने तसेच स्वयंसेवकही तैनात केले आहेत. महाड मतदारसंघामध्ये दोन हजार १११ अपंग मतदार आहेत, यापैकी १०६ अंध मतदार आहेत. एक हजार ४७० अस्थिव्यंग मतदार, १०७ दृष्टिदोष असलेले मतदार, २२४ मूकबधिर, १३ बहुविकलांग तर १९१ गतिमंद अशा विविध प्रकारातील अपंग मतदारांचा यात सहभाग आहे. यामध्ये या मतदारांना ने आण करण्यासाठी २२० गाड्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच ७६ व्हीलचेअर, नऊ डोलीची सोय केली आहे. अंध मतदारांकरिता १०६ ब्रेलशिट्स तयार केल्या आहेत. अपंगांच्या मदतीसाठी ३७९ स्वयंसेवकही सज्ज ठेवले आहेत.
२महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मतमोजणी केली होणार असून, या ठिकाणी १४ टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. प्रत्येक टेबलकरिता एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे. या ठिकाणी आणि मतदानाकरिता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून केरळ येथील इंडियन बटालियनचे पाच अधिकारी तसेच ८६ पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. तसेच होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलही बोलावण्यात आले आहे. मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. सुमारे ५० जणांचे मतदान केले जाणार आहे. जवळपास ९५ टक्के मतदार स्लीप वितरित करण्यात आल्या आहेत. ज्यांना या मतदान स्लीप प्राप्त झालेल्यांना मत केंद्रांवर या स्लीप दिल्या जातील. मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुविधा पुरवणार आहेत.