पनवेलमधील सिडको वसाहतीतील पाणीपट्टीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 12:59 AM2020-05-23T00:59:47+5:302020-05-23T01:00:07+5:30
पनवेलमध्ये कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर, तळोजा, नावडे भागांचा विकास सिडकोमार्फत करण्यात आला असून येथे सुविधाही याच प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहेत.
कळंबोली : लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. दोन महिन्यांपासून उत्पादन ठप्प झाल्याने काहींच्या वेतनातही कपात करण्यात आल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीतील पाणीबिलात ३० टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी परिसरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येऊन दरवाढ तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पनवेलमध्ये कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर, तळोजा, नावडे भागांचा विकास सिडकोमार्फत करण्यात आला असून येथे सुविधाही याच प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहेत. पनवेल महापालिका स्थापन झाली असली, तरी वसाहतीतील सुविधांसाठी शहरी नोड सिडकोकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी, नवी मुंबई महापालिका, यांच्याकडून सिडको पाणी विकत घेते. तर तेच पाणी सिडको वसाहतींना पुरवठा करते. लॉकडाउन काळात सिडकोने पाणीबिलात ३० टक्के वाढ केली आहे.
रहिवासी वापरातील सदनिकाधारकांना दर महिन्याला २० हजार लीटर पाण्यासाठी पावनेपाच रुपये प्रतियुनिट आकारले जात होते. आता सहा रुपये आकारण्यात येत आहेत. २० ते २७ हजार लीटर पाण्यासाठी आधी सहा रुपये घेतले जात होते. त्यात आता दोन रुपयांनी वाढ करून आठ रुपये केले आहे. २७ ते ३६ हजार लीटर पाण्यासाठी ७ रुपये दर होता. आता तो १० रुपये करण्यात आला आहे. ३६ ते ४२ हजार लीटर पाण्यासाठी प्रतियुनिट २० रुपये आकारले जाणार आहे. त्याचबरोबर वाणिज्य वापरासाठी आधी हजार लीटरसाठी प्रतियुनिट ३५ रुपये आकारले जात होते. आता १० रुपये वाढवण्यात आले असून प्रतियुनिट ४५ रुपये भरावे लागणार आहे. शैक्षणिक संस्थांसाठी १४ रुपये प्रतियुनिट होते तर आता १८ रुपये केले आहे.
कोरोनामुुळे आधीच नागरिक हतबल झाले आहेत. अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या अनेकांच्या पगाराला कात्री लागली आहे तर काहींचे पगार अद्याप झालेले नाहीत, त्यामुळे जमापुंजी खर्ची पडत आहे.
पाणीदर (प्रतियुनिट रुपयांत )
पूर्वीचे वाढीव
२० हजार लीटर ४.४५ ६
२० ते २७ हजार लीटर ६ ८
२७ ते ३६ हजार लीटर ७ १०
३६ ते ४२ हजार लीटर १० २०
वाणिज्य वापरासाठी
हजार लीटरसाठी ३५ ४५
शैक्षणिक संस्था १४ १८
सिडकोने पाणीदरात वाढ करून ३१ मेपर्यंत भरण्यास सांगितल्याने रहिवाशांच्या तोंडचे पाणीच पळाले.
पाणीपट्टीची दरवाढ मार्चपूर्वीच करण्यात आली आहे. ती देयके आता पाठवण्यात आली आहेत. लॉकडाउनच्या परिस्थितीची जाणीव आहे. मात्र, आम्हालाही पाणी विकत घ्यावे लागते. पाणीबिलात झालेली वाढ रद्द करण्याबाबत रहिवाशांकडून मागणी केली जात आहे, तसे वरिष्ठांना कळवले आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल.
- गजानन दलाल, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा सिडको.