अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत विविध गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातील अधिक गुन्हे हे महिलांवरील विशेषत: अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, विनयभंग आणि अपहरणाचे आणि महिलेस ठार मारण्याची धमकी देण्याचे दाखल झाले असल्याने महिलावर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे रायगड पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी संध्याकाळी (१५ जुलै)साडेपाचच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाने आपल्या ओळखीच्याच अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून रोहा शहराजवळच्या हनुमान टेकडीच्या बाजूला असलेल्या जंगलभागात नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी, त्या अल्पवयीन मुलावर रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण तालुक्यातील फणसडोंगरी गावातून १४ जुलै रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचच्या सुमारास या मुलीस घरीच ठेवून तिचे आई व वडील बळवली येथे गेले होते. ते सायंकाळी पुन्हा घरी आले असता, मुलगी घरात दिसून आली नाही. घरात हजर असलेल्या त्यांच्या मुलाकडे तिच्याबाबत विचारणा केली असता, त्यास काहीएक माहीत नसल्याचे त्याने सांगितले. मुलीचा त्यांनी सर्व नातेवाईक व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र ती न मिळाल्याने अल्पवयीन असल्यामुळे तिला कोणीतरी पळवून नेले असल्याची तक्रार अखेर त्यांनी पेण पोलीस ठाण्यात दाखल केली. रसायनीमधील एका मुलीचे घरातून एका अज्ञात व्यक्तीने मंगळवारी अपहरण केल्याप्रकरणी अपहृत मुलीच्या आईने रसायनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ ते १५ जुलै या काळात सकाळी ७.१० च्या सुमारास आपल्या मैत्रिणींसोबत कॉलेजला जात असताना, आरोपीने तिचा पाठलाग करून तिचा हात पकडून माझ्यासोबत का बोलत नाही, असे विचारून व छुपा पाठलाग करून विनयभंग केला. त्या कॉलेज युवतीनेच पेण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार पेण पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.पेण तालुक्यातील उचेडे गावातील एका अल्पवयीन मुलीला कासव दाखवतो व पैसे देतो, असे आमिष दाखवून नवीन बांधलेल्या सार्वजनिक शौचालयामध्ये दोघा नराधम आरोपींनी तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १२ जुलै रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी अत्याचारित अल्पवयीन मुलीच्या आईने मंगळवारी फिर्याद दाखल केली. (विशेष प्रतिनिधी)
महिलांशी निगडित गुन्ह्यांत वाढ
By admin | Published: July 20, 2015 3:24 AM