पेण : राज्यात मोठमोठ्या शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच पेण तालुक्यातही सोमवारी रुग्ण संख्या वाढल्याने पेणकरांची चिंता वाढली आहे. यामुळे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, पेण नगर परिषदेच्या माध्यमातून बाजारपेठ, नाक्यावर विनामास्क फिरणारे नागरिक व दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन वरिष्ठ पातळीवरून लॉकडाऊनबाबत निर्णय होईल, अशी माहिती मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, २०२१ च्या सुरुवातीपासून कोरोनाचे प्रमाण कमी होत गेले; परंतु दोन महिने होताच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षभर सुरू असलेला कोरोना दोन महिन्यांपासून आटोक्यात आलेला असतानाच मुंबई, ठाणे, पुणे शहरात कोरोना रुग्णांची वाढ झाल्याबरोबर पेण तालुक्यातही सोमवार, २२ फेब्रुवारीला दहा रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने प्रशासन अलर्ट झाले. यामुळे पेणकरांची धाकधूक वाढली आहे.
पुढील चार दिवस हीच स्थिती राहिल्यास पेण तालुक्यातही सर्व बंदची चिन्हे होण्याइतपतची स्थिती निर्माण झाली आहे. पेण तालुक्यातून शहरात येणाऱ्यांची संख्या मात्र वाढत असताना नागरिकही बेफिकीरीप्रमाणे वागत असतानाचे चित्र दिसत आहे. पेण नगरपालिकेने मास्क वापरण्यासाठीची कारवाई वेगात सुरू केली आहे. गावागावातून खरेदीसाठी आलेल्यांच्या चेहऱ्यांवर मास्क नसल्याने नगर परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना आता दिवसाकाठी ४० ते ५० जण मास्क न लावलेले सहज सापडत आहेत.
रविवारपासून गुरुवारी सकाळपर्यंत ७४ जणांवर कारवाई केली आहे. चार दिवसांत म्हणजे शनिवारी १६ हजार तर सोमवारी ५ हजार ५००, मंगळवारी ५ हजार, बुधवारी २ हजार ५०० अशी एकूण २९ हजार रुपये दंडात्मक कारवाईची रक्कम नागरिक व दुकानदारांकडून वसूल केली आहे. दररोज एक पथक याप्रमाणे सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी अंकिता इसाळ यांनी दिली.