रमजानने वाढविला फळांचा भाव

By निखिल म्हात्रे | Published: March 22, 2024 11:55 AM2024-03-22T11:55:14+5:302024-03-22T11:55:57+5:30

विशेष म्हणजे कलिंगड, टरबूज, अननस, पपई यांसारख्या रसदार फळांना मोठी मागणी आहे.

increased the price of fruits due to ramadan | रमजानने वाढविला फळांचा भाव

रमजानने वाढविला फळांचा भाव

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - उन्हाळ्यासह आता रमजान महिन्यालाही सुरुवात झाल्याने फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात फळांची आवक वाढली आहे. मागणी वाढल्याने पर्यायाने फळांच्या दरातही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कलिंगड, टरबूज, अननस, पपई यांसारख्या रसदार फळांना मोठी मागणी आहे.

यावर्षी उन्हाचा तडाखा लवकर सुरू झाला आहे. तडाखा वाढू लागल्यापासून फळांना मागणी वाढली आहे. फळांचे रस तयार करण्यासाठीही फळांना मागणी आहे. त्यातच रमझान हा उपवासाचा महिना सुरू झाल्यामुळे कलिंगड, टरबूज, अननस, पपई यांसारख्या रसदार फळांना अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे बाजारात सध्या कलिंगडची मोठी आवक दररोज होत आहे तर, टरबूज, पपईच्याही अनेक गाड्या दररोज येत आहेत. कलिंगडच्याही शुगर किंग, नामधारी या दोन्ही जातींच्या कलिंगडाची आवक आता होऊ लागली आहे. द्राक्षांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असल्याने बाजारात गोड द्राक्षे येत आहेत आणि त्यांचे दरही स्थिर आहेत. रमजानमुळे द्राक्षांनाही मागणी आहे.

आठवड्याभरापूर्वी पर्यंत घाऊक फळ बाजारात आठ ते दहा रुपये किलोपर्यंत असलेली कलिंगडे आता १५ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहेत. तर, खरबुजाचे दरही १० ते १२ रुपये किलोपासून २५ रुपये किलो झाले आहेत. द्राक्षांचे दरही ८० ते १०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. अननसही ५० ते ६० रुपये एक नग या प्रमाणे विकले जात आहेत. पपईही १५ ते २० रुपये किलो झाली आहेत. काही फळांच्या दरात दुप्पट तर, काहींच्या २० ते ३० टक्क्‌यांपर्यंत वाढ झाली असल्याची माहिती फळ व्यापार्‍यांनी दिली. तसेच, किरकोळ बाजारात द्राक्षे १०० ते १२० रुपये किलो, डाळिंब १८० ते २०० रुपये किलो, कलिंगड ३० ते ४० रुपये किलो, टरबूज ३० ते ४० रुपये किलो तर, सफरचंद १५० ते २०० रुपये किलो झाली आहेत. अननस ७० ते ८० रुपये नग या प्रमाणे विकली जात आहेत. दरम्यान, महिनाभर फळांची दरवाढ कायम राहणार असल्याचा अंदाज असून या उन्हाळ्यात फळांसाठी ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

 

Web Title: increased the price of fruits due to ramadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग