उन्हाची काहिली वाढल्याने थंड पेयांना वाढती मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:55 AM2018-04-23T03:55:06+5:302018-04-23T03:55:06+5:30
रोह्यातील स्थिती : लिंबू आणि कोकम सरबतला अधिक पसंती
धाटाव : वातावरणातील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने रोह्यात जागोजागी थंड पेयांना मागणी वाढली आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाºयांसह खासगी वाहनांतील प्रवासीवर्गाचे पाय आता थंड पेयांच्या स्टॉलकडे वळू लागले आहेत. त्यामुळे स्टॉलधारकही खाद्यपदार्थांपेक्षा थंड पेयांच्या विक्रीवरच जास्त भर देत असल्याचे दिसते.
कोकणवासीयांनी शिमगा, होळीचा सण साजरा केलेल्याला आज दीड महिना होऊन गेला. मात्र, या सणानंतर प्रचंड उष्मा जाणवू लागला आहे. तर अधिकाधिक वाढत असलेल्या दाहकतेमुळे उन्हाचे चांगलेच चटके लागत आहेत. उन्हाच्या झळीमुळे दुचाकीवरून दुपारनंतर प्रवास आता नकोसा झाल्याने काही जण घरातच बसणे पसंत करताना दिसतात. तर रोह्यात अनेकांनी उन्हापासून संरक्षण म्हणून छत्र्या वापरण्यास सुरुवात केल्याचे पाहावयास मिळते. तर दुचाकी चालविणाºया महिला स्कार्फ वापरताना दिसत आहेत. अतिउष्णतेमुळे रस्त्यावर चालताना पादचारीवर्गाची पावले आता थंड पेयांच्या दुकानांकडे वळताना दिसतात. यामध्ये लिंबू सरबत, कलिंगड व कोकम सरबतला अधिकाधिक पसंती मिळत असल्यामुळे सर्वच स्टॉलवर दोनही पेय मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. सध्या मिनरल वॉटर, सरबत, उसाचा रस, या थंड पेयांबरोबर इतर पेयांची मागणी वाढत आहे.
बाजारपेठेसह बसस्थानक, मिनिडोअर-रिक्षा स्टँड, आइसक्रीम पार्लर व इतर ज्यूस सेंटर ठिकाणी उन्हाच्या काहिलीपासून थोडीशी
उसंत घेण्याकरिता प्रचंड गर्दी दिसून येते.