भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला बसणार आळा; ७०० कुत्र्यांची केली नसबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:02 AM2019-10-27T00:02:56+5:302019-10-27T00:03:18+5:30
एक हजाराचे लक्ष्य; अलिबाग नगरपालिकेचा उपक्रम
अलिबाग : नागरिकांना आता भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला घाबरून जाण्याचे कारण नाही. अलिबाग नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत सुमारे ७०० भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. एक हजार भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचे लक्ष ठेवण्यात आल्याने भविष्यात भटक्या कुत्र्यांच्या संख्येला आळा घातला जाणार आहे.
सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन संस्थेला ठेका देण्यात आला आहे. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते. लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांवर हल्ला करणे, त्यांच्या मागे लागून भुंकणे त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बाहेर पडणे कठीण होते. नागरिकांचा चावा घेतल्याने बऱ्याच जणांना रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला आहे. कुत्रा चावल्याने गंभीर परिणाम उद्भवतात. त्यासाठी रॅबीजची लस टोचून घेण्यावाचून गत्यंतर नसते. त्यामुळे कुत्र्यापासून सर्वांनाच भीती वाटते. शहरामध्ये वाढलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे नाक्यानाक्यांवर आणि गल्लोगल्ली टोळी करून ते बस्तान मांडून राहतात. तसेच रात्री सातत्याने भुंकून झोपेचाही खोळंबा होतो. भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे अलिबाग नगरपालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतला. सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेची यासाठी नेमणूक केली आहे. या संख्येकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. अलिबाग बंदरावर नगरपालिकेने संस्थेला जागा उपलब्ध करून दिली आहे.
सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेमध्ये एक डॉक्टर, दोन सहायक डॉक्टर आणि पाच मदतनीस यांचा समावेश आहे. सकाळी ६ वाजल्यापासून संस्थेची टीम भटक्या कुत्र्यांचा शोध घेऊन त्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करत आहे. निर्बीजीकरण शस्त्रक्रियेवेळी कुत्र्यांचे लसीकरणही केले जाते. त्यामुळे त्यांच्यापासूनचा धोका कमी केला जातो. आतापर्यंत ७०० भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. त्यामध्ये मादी कुत्र्यांची संख्या अधिक असल्याची माहिती सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेचे व्यवस्थापक सचिन देऊळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महिनाभर कुत्रा निर्बीजीकरण मोहीम सुरू
एक महिना ही मोहीम सुरू राहणार आहे. शहरातील सुमारे एक हजार कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रि या करण्यावर भर देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाच वर्षांतून एकदा नसबंदीची मोहीम राबवणे गरजेचे आहे, असे सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेचे व्यवस्थापक सचिन देऊळकर यांनी सांगितले. एका कुत्र्यासाठी सुमारे एक हजार ८४० रुपये खर्च येतो. भटक्या कुत्र्याला पकडल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करून नसबंदी करण्यात येते. त्यानंतर त्यांना तीन दिवसांनी पुन्हा ज्या ठिकाणी पकडले होते तेथेच सोडण्यात येते. एकदा नसबंदी केलेला कुत्रा ओळखण्यासाठी कुत्र्याच्या डाव्या कानावर व्ही आकाराची खूण केली जाते. त्यामुळे ओळखणे सोपे जाते, असेही त्यांनी सांगितले.
1480 रुपये एका कुत्र्यासाठी खर्च येतो