कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा माथेरानमधील पर्यटनावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:44 AM2021-04-04T00:44:50+5:302021-04-04T00:45:54+5:30
पर्यटकांची संख्या रोडावली : व्यावसायिकांवर मोठा परिणाम
माथेरान : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील निर्बंध अधिक कडक केले आहेत. त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसताना दिसतोय. गेल्या दोन आठवड्यांत सलग सुट्ट्या असूनदेखील बहुतेक पर्यटन क्षेत्रांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. माथेरान ही त्याला अपवाद नाही. कोरोनामुळे येथे येणा-या पर्यटकांची संख्या रोडवल्याने व्यावसायिक चिंतित आहेत.
माथेरानकरांसाठी मागील वर्ष खूप वाईट गेले. पहिले निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण गावाची दाणादाण उडवली होती त्यातून सावरत नाही तोच कोरोनाचा कहर झेलावा लागला होता जो अजून ही सुरूच आहे. गेल्या वर्षी पर्यटन हंगामाची वाट पाहणाऱ्या येथील व्यावसायिकांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. लॉकडाऊनने माथेरानकरांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला ज्यातून अनेक जण अजून ही सावरलेले नाहीत. संपूर्ण आर्थिक व्यवहारच बंद झाल्याने अनेकांना मोलमजुरी करून घर चालवावे लागले होते. या काळातील व्यावसायिकांची वीज व पाणी बिले थकली होती जी अजून ही भरण्याची आर्थिक परिस्थिती येथील स्थानिकांची झालेली नाही. गेले काही दिवस येथील पर्यटन सुरू झाले होते. त्यामुळे येथील स्थानिकांना थोडासा दिलासा मिळाला होता, पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने सलग लागून आलेल्या होळी व गुड फ्रायडेच्या सुट्ट्यांना लाभलेला अल्प प्रतिसाद पाहून व्यावसायिकांची चिंता वाढू लागली आहे. त्यातच लॉकडाऊनबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चा मुळे येथील बहुतेक आगाऊ बुकिंग रद्द होऊ लागले आहे. अशा या स्थितीत सर्वसामान्यांचा विचार न करता फक्त मार्चअखेरीचे आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी वीज व पाणी प्रशासन येथील व्यावसायिकांच्या मागे हात धुऊन लागले आहे. अनेकांच्या जोडण्या खंडित ही करण्यात आलेल्या आहेत. पर्यटकांमध्ये होत असलेली घट व घरची बेताची आर्थिक परिस्थिती यामध्ये येथील व्यावसायिक भरडला जात आहे.
माथेरानमधील सर्व आर्थिक व्यवहार हे पर्यटनावर अवलंबून आहेत आणि पर्यटकच यायचे बंद झाले तर त्याचा थेट फटका येथील हातरिक्षा, अश्वचालक, हॉटेल व स्थानिक व्यावसायिकांना बसत असतो. त्यामुळेच येथील व्यावसायिक लॉकडाऊनच्या विरोधात आहेत. पुन्हा लॉक डाऊन झाल्यास येथील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प होऊन अनेकजण बेरोजगारीच्या खाईत नकळत लोटले जातील. तसेच मिनीट्रेनही पर्यटकांअभावी रिकाम्याच धावताना दिसतात.