माणगाव : कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने रोहा ते वीर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी इंदापूर रेल्वे स्थानक १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. या कालावधीत प्रवाशांनी माणगाव व कोलाड रेल्वे स्थानकांतून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रवाशांच्या माहितीसाठी इंदापूर रेल्वे स्थानकात सूचना फलकही लावण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी सेवा आणि पायाभूत सुविधा वाढविण्यावर रेल्वे प्रशासनाकडून भर दिला जात आहे. कोकण रेल्वेमार्गावर रोहा-वीर ट्रॅक डबलिंग आणि दहा नवीन स्थानके व आठ लूप लाइन बांधण्याचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. प्रवाशांच्या उत्तम सुविधांसह येथे स्थानक उभारणीचे काम सुरू असून याचा लाभ इंदापूर व परिसराच्या प्रगतीसाठी होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.रोहा-वीर विभाग ट्रॅक डबलिंगचे क्षमता वाढवण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मुख्य रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे इंदापूर (हॉल्ट) स्थानकात प्रवाशांना चढणे आणि गाड्यांमधून प्रवास करणे कठीण होईल, तसेच वेरावली हॉल्ट स्थानकावर नवीन लूप लाइन व प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामांदरम्यान प्रवाशांना वेरावली (हॉल्ट) स्थानकात रेल्वेत चढणे आणि गाड्यांमधून प्रवास करणे कठीण होईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी इंदापूर (हॉल्ट) आणि वेरावली (हॉल्ट) स्थानकांवरील प्रवाशांच्या वाहतुकीसाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.