इंदापूर बाजारपेठेतील रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:35 PM2019-06-05T23:35:20+5:302019-06-05T23:35:26+5:30
अपघाताची शक्यता : पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची नागरिकांची मागणी
माणगांव: इंदापूर ते मादांड आणि मादांड ते आगरदांडा रस्त्याचे दिघी पोर्टकरिता काम सुरू आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा असून, यासाठी २५० कोटींचा खर्च करण्यात येत आहे. हे दोन्ही रस्ते बनविण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे ठेकेदार आहेत. इंदापूर बाजारपेठेतील रस्ता मागील एक महिन्यापासून खोदून ठेवण्यात आलेला आहे. या रस्त्यावर ठेकेदाराकडून सतत पाणी मारले जात असून हा रस्ता चिखलयुक्त झाला आहे, यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हा रस्ता पावसाळ्यापूर्वी ठेकेदाराकडून बनविला नाही तर चिखलयुक्त होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. हा रस्ता जवळ जवळ दीड ते दोन कि.मी.चा असून शाळा, कॉलेजचे विद्यार्थी या रस्त्यावरून प्रवास करीत असतात. तसेच हा रस्ता इंदापूर येथील मुख्य बाजारपेठेतून गेला आहे. त्यामुळे इंदापूर परिसरातील आजूबाजूच्या गावातील नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने व लोकवस्ती आहे, त्यामुळे नेहमीच्या वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्तावरील धूळ लोकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये जात आहे. याचा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील समस्या लक्षात घेऊन या रस्त्याकडे ठेके दाराने लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वीरस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी इंदापूर येथील नागरिकांकडून होत आहे.