अपक्ष उमेदवार पाटील यांची मागणी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:52 PM2019-04-09T23:52:06+5:302019-04-09T23:52:25+5:30

रायगड लोकसभा मतदारसंघ : मत पदरात पाडण्याचा अनोखा प्रयत्न

Independent candidate rejected the demand of Patil | अपक्ष उमेदवार पाटील यांची मागणी फेटाळली

अपक्ष उमेदवार पाटील यांची मागणी फेटाळली

Next

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुभाष जनार्दन पाटील यांनी सोमवारी अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यावर बॅलेट मशिनवरील मतपत्रिकेत आपले नाव ‘सुभाष पाटील उर्फ पंडितशेठ पाटील’ असे नमूद करण्यात यावे, अशी मागणी केली होती, ती फेटाळण्यात आली. त्यांचे नाव सुभाष जनार्दन पाटील असेच नमूद करण्यात येईल अशी माहिती रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.


अपक्ष उमेदवार सुभाष जनार्दन पाटील यांनी आपले नाव ‘सुभाष पाटील उर्फ पंडितशेठ पाटील’ असे नमूद करण्यात यावे, अशी मागणी केल्याचे समजताच अपक्ष उमेदवार योगेश दीपक कदम यांच्या वतीने प्रतिनिधी अ‍ॅड. सचिन जोशी यांनी याबाबत रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे हरकत दाखल केली. या प्रकरणी डॉ. सूर्यवंशी यांनी तत्काळ सोमवारी संध्याकाळी ७ वाजता सुनावणी घेऊन अपक्ष उमेदवार सुभाष जनार्दन पाटील आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे प्रतिनिधी अ‍ॅड. सचिन जोशी यांना आपापली बाजू मांडण्याची संधी दिली.


सुभाष पाटील उर्फ पंडितशेठ पाटील हे नाव अलिबागचे शेकापचे विद्यमान आमदार सुभाष पाटील उर्फ पंडितशेठ पाटील यांचे असल्याचे विविध पुरावे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे प्रतिनिधी अ‍ॅड. सचिन जोशी यांनी सुनावणीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना सादर केले. या नावावर आताच्या लोकसभा निवडणुकीत शेकापच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून शेकापच्या मतदारांची पर्यायाने आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांची मते बाद करण्याकरिताचा हा खोडसाळपणा विरोधकांचा आहे. परिणामी, अपक्ष सुभाष जनार्दन पाटील यांना बॅलेट मशिनवर ‘सुभाष पाटील उर्फ पंडितशेठ पाटील’ असे नाव नमूद करण्याची परवानगी देता येणार नाही, अशी बाजू अ‍ॅड. जोशी यांनी मांडली.


दरम्यान, ‘सुभाष पाटील उर्फ पंडितशेठ पाटील’ हे नाव आपले आहे याचे पुरावे देऊन ते सिद्ध करावे, अशी संधी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अपक्ष उमेदवार सुभाष जनार्दन पाटील व त्यांच्या प्रतिनिधींना दिली. मात्र, या बाबतचे कोणतेही पुरावे ते सादर करू शकले नाहीत. अखेर उभयपक्षीयांना आपापली बाजू मांडण्याची संधी देऊन, अपक्ष उमेदवार सुभाष जनार्दन पाटील यांना ‘सुभाष पाटील उर्फ पंडितशेठ पाटील’ हे नाव वापरता येणार नाही तसेच बॅलेट मशिनवर देखील तसे नाव नमूद करण्यास परवानगी देता येणार नाही, असा निर्णय देऊन, अपक्ष उमेदवार सुभाष जनार्दन पाटील यांची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी फेटाळून लावली
आहे.

नामसाधर्म्य क्लृप्तीच्या फटक्यातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनंत गीते बचावले
च्नामसाधर्म्याचे अपक्ष उमेदवार जाणिवपूर्वक निवडणुकीत उभे करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून अधिकृत राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवाराची मते बाद करण्याची राजकीय क्लृप्ती रायगड जिल्ह्यात फार जुनी आहे. आता लोकसभा निवडणुकीतदेखील या क्लृप्तीचा वापर राजकीय पक्षांकडून करण्यात आला. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनंत गीते यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार अंनत पद्मा गीते यांचा उमेदवारी अर्ज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधकांनी दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गीते यांच्या सूचनेने, अर्जावरील स्वाक्षरी माझी नाही असे प्रतिज्ञापत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे दाखल केले. या प्रकरणीदेखील सुनावणी झाली आणि अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गीते यांचा उमेदवारी अर्ज डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बाद ठरवला. परिणामी, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनंत गीते यांचा मते बाद होण्याचा धोका टळला.

नामसाधर्म्य क्लृप्तीतून बचावण्याकरिता आघाडीचे विशेष नियोजन
च्आघाडीचे उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्या विरोधकांनी दाखल केलेले अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे या दोघांचे उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरल्याने रिंगणात आता आघाडीचे उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे आणि दोन अपक्ष असे तीन उमेदवार आहेत. नामसाधर्म्याच्या उमेदवारास आघाडीचे उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांची मते जाणार नाहीत, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, मित्रपक्ष यांनी विशेष नियोजन केले असल्याची माहिती आघाडीच्या सूत्रांकडूून प्राप्त झाली आहे.

 

Web Title: Independent candidate rejected the demand of Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.