अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढविण्याच्या परंपरेस सन १९८० च्या लोकसभा निवडणुकीत रतिलाल शहा यांनी प्रारंभ केला. त्यांना केवळ ०.६८ टक्के मते मिळाली होती. त्यानंतर सन १९८४ मध्ये दोन, १९८९ मध्ये तीन, १९९१ मध्ये सहा, १९९६ मध्ये बारा, १९९८ मध्ये एक, १९९९ मध्ये एक, २००४ मध्ये एक, २०१४ मध्ये दोन अपक्ष उमेदवार रिंगणात होते.
१९८०च्या लोकसभा निवडणुकीत सुरू झालेली अपक्ष उमेदवार परंपरा पुढे अबाधित राहिली. १९८४ मध्ये कृष्णा गायकवाड आणि विलास तुपे अपक्ष उमेदवार होते. १९९१ मध्ये सहा अपक्ष उमेदवार होते, त्यांना एकूण ३१ हजार ८५५ मते मिळाली तर विजयी उमेदवाराचे मार्जिन ३९ हजार ७०६ मतांचे होते. १९९६ मध्ये १२ अपक्ष उमेदवार होते, त्यांना एकूण १८ हजार २0९ मते मिळाली तर त्यापैकी तीन दत्ता पाटील नामसाधर्म्याच्या उमेदवारांना ७ हजार १५० मते मिळाली आणि काँग्रेसचे बॅ.ए.आर.अंतुले ४ हजार ७ अशा मार्जिनने विजयीझाले होते. १९९८, १९९९, २००४ मध्ये प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार होता.
२०१४ मध्ये दोन अपक्ष उमेदवार होते त्यापैकी एक राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार सुनील श्याम तटकरे रिंगणात होते. त्यांना ९ हजार ८४९ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचा शिवसेनेचे गीते यांच्याकडून केवळ २११० मतांनी पराभव झाला.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे सुनील सखाराम तटकरे व सुनील पांडुरंग तटकरे असे दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.