भारत व्यवस्थेमुळेच जगात टिकू शकला
By admin | Published: January 10, 2017 05:58 AM2017-01-10T05:58:41+5:302017-01-10T05:58:41+5:30
माणूस हा सातत्याने व्यवस्थेला प्रतिसाद देणारा आहे. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे की, जो केवळ कायद्यामुळे नव्हे
अलिबाग : माणूस हा सातत्याने व्यवस्थेला प्रतिसाद देणारा आहे. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे की, जो केवळ कायद्यामुळे नव्हे, तर व्यवस्थेमुळे टिकू शकला आहे. जागतिक अर्थकारणात देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता, ती बदलण्याकरिता काळ््या पैशाला लगाम आणि भ्रष्टाचार मुक्तता याकरिता नवीन आर्थिक व्यवस्था अत्यावश्यक असल्याचे विचारात घेऊन अर्थक्रांती मोड्यूल दिले आहे. आपल्या देशातील सर्व क्षमतांचा वापर पूर्णपणाने केला, तर साऱ्या जगाला भारत जेऊ घालू शकतो, असा विश्वास अर्थक्रांतीकार अनिल बोकील यांनी व्यक्त केला आहे.
रायगड मेडिकल असोसिएशन आणि आरसीएफ रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सरखेल कान्होजी आंग्रे वसाहतीमधील आरसीएफ सभागृहात आयोजित दोन दिवसांच्या ‘रायकॉन-२०१७’या डॉक्टरांच्या अभ्यासकार्यशाळेत बोकील यांनी ‘अर्थक्रांती’ या विषयावर आपल्या संगणकीय प्रस्तुतीकरणासह व्याख्यान दिले. बोकील आपल्या अर्थनीती संशोधनात्मक व्याख्यानात म्हणाले की, स्रोत (सोर्स)आणि संसाधन (रिसोर्स) यांच्यामधील निखळलेल्या दुव्यामुळेआर्थिक समस्यांना केवळ भारतालाच नव्हे, तर साऱ्या जगाला सामोरे जावे लागत आहे. पृथ्वीवरील लोकसंख्या इ.स.१००० मध्ये २० कोटी ८० लाख झाली. इ.स.१८०६ मध्ये लोकसंख्येत पहिली मोठी वाढ दिसून आली आणि लोकसंख्या १०० कोटी झाली. पुढील १२० वर्षांच्या दुसऱ्या टप्प्यात इ.स. १९२६ मध्ये ही लोकसंख्या दुप्पट होऊन २०० कोटी झाली आणि सद्यस्थितीत पृथ्वीची लोकसंख्या तब्बल ७५० कोटी झाली आहे. परिणामी, या लोकसंख्येकरिता उपलब्ध नैसर्गिक स्रोत पुरे पडू शकत नाहीत.परिणामी, संसाधनांचा ताळमेळ राहात नाही. त्यातून आर्थिक ताणाची निर्मिती होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मानवी आयुष्यात पैशाला अनन्य साधारण महत्त्व आहे. ‘धन’ आणि ‘द्रव्य’ यांचा ताळमेळ नसल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. देशात उपलब्ध सोन्याचा पैशांबरोबर (करन्सी) असलेल्या संपूर्ण भारतात १९५६मध्ये, तर उर्वरित जगात १९७१मध्ये संपुष्टात आला आहे. पैसा म्हणजे नोटा हे विनिमयाचे माध्यम आहे, त्या व्यवहारातच राहिल्यातर त्याची उपयुक्तता देशास असते; परंतु त्या जमा करून संचय केला, तर त्यांचा व्यवहारास उपयोग नाही आणि म्हणूनच त्यांचा नोट संचय करता येणार नाही, अशी अर्थनीती गरजेची आहे. त्याकरिता अर्थक्रांती असल्याचे सांगितले.
सरकारकडे जमा होणारा कराचा पैसा योजनांच्या माध्यमांतून थेट लाभार्थीच्या खात्यात येईल, असे पर्याय सुचविण्यात आले असल्याचे बोकील यांनी सांगितले.
यावेळी रायगड मेडिकल असोसिएशच्या या ‘रायकॉन-२०१७’चे प्रमुख बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक पाटील, असोसिएशनचे पदाधिकारी स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ. निशिगंध आठवले, ‘चला मुलांना घडवू या’ या बालकपालक प्रबोधन उपक्रमाचे प्रणेते डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, डॉ. राजीव धामणकर यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे ८०० डॉक्टर्स आवर्जून उपस्थित होते.