अलिबाग : जिल्ह्यात पावसाने उद्भवलेल्या महापुरामुळे तब्बल १,५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकासह भारतीय लष्करालाही पाचारण केले आहे. पेणमध्ये त्यांचा बेस कॅम्प राहणार असल्याने जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी निर्माण होणाऱ्या आपत्तीस्थळी तातडीने मदतीसाठी ते पोहोचणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गेल्या ७२ तासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, रोहा, महाड, पोलादपूर हे जलमय झाले होते. पुराचा सर्वाधिक फटका हा पेण तालुक्याला बसला होता. मोठ्या संख्येने नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले होेते. यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची मदत घेतली होती. आता एनडीआरएफच्या सोबतच भारतीय लष्करही मदतीसाठी जिल्ह्यात दाखल झाले आहे.पेण तालुक्यात तब्बल ४९८ मिमी पाऊस झाला होता, तसेच धरणातून सोडलेले पाणी आणि समुद्राला आलेले उधाण यामुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी पूरग्रस्त भागात जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी भारतीय लष्कराचे मेजर हिमांशू सलुजा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पाहणी केली. निसर्गाच्या प्रकोपामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेल्या नागरिकांची चौकशी करून जिल्हा प्रशासनाकडून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जांभूळपाड्यानंतरचा सर्वात मोठा पूरजिल्ह्यात पुढील कालावधीत अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि लष्कराचे पथक पेणमध्ये तैनात राहणार आहे. पुण्यातून येण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मदतीसाठी विविध सामाजिक संस्था, नागरिक, प्रशासन, पोलीस यंत्रणा, तटरक्षक दल असे सर्वच आहेत. मात्र आपत्तीच्या कालावधीत मदतीसाठी हात कमी पडू नयेत, तातडीने मदत मिळावी यासाठी एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक येथेच राहणार आहे. १९८९ साली जांभूळपाडा येथे आलेल्या महापुरानंतर पेण तालुक्यात आलेला महापूर मोठा होता, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यात आपत्तीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 2:10 AM