श्रीवर्धन : देशातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचे दायित्व भारतीय सेनेचे आहे. सागरी सुरक्षेसाठी जनतेने नियमाचे पालन करत नौसेनेला सहकार्य करावे. आपणा सर्वांच्या दक्षतेमुळे देशाच्या विविध भागांतील सागरी सीमा बळकट झाल्या आहेत, असे प्रतिपादन लेफ्टनंट कमांडर सलमान खान यांनी केले.श्रीवर्धन पोलीस व भारतीय नौसेना यांच्या संयुक्तिक सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन शेखाडी येथे करण्यात आले होते. सलमान खान यांनी या प्रसंगी उपस्थित जनसमुदायाशी मुक्तपणे संवाद साधला. सागरी सुरक्षेतील जनतेच्या भूमिकेचे महत्त्व, जनतेच्या अडी अडचणी व समस्या, नौसेनेचे दायित्व, नौसेनेची कार्यपद्धती, दहशती हल्ले आणि सामान्य व्यक्ती या विषयी सलमान खान यांनी मार्मिक मार्गदर्शन केले.सलमान खान यांनी सागरी सुरक्षेसाठी आपण सर्वांनी सदैव सतर्क असणे गरजेचे आहे. सागरी मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे त्याचा फायदा आपण आपल्या सुरक्षेसाठी करा. आपल्या सागरी हद्दीत कुठेही अपरिचित बोट अथवा जहाज आढळल्यास तात्काळ नौसेना, स्थानिक पोलीस ठाणे व सागरी सुरक्षा रक्षकांना त्यांची कल्पना द्या. आपल्या हद्दीत इतर परकीय घटकांची घुसखोरी आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे असे खान यांनी सांगितले. नौसेनेला सामान्य माणसाची मदत मिळाल्यास कोणताही अनुचित प्रकार कदापि घडणार नाही.सागरी भागातील प्रत्येक मच्छीमार देशाचा सैनिक आहे. भारतीय सेना देशातील प्रत्येक घटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे असे सलमान खान यांनी सांगितले. यावेळी श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी उपस्थित जनतेस सहकार्याचे आवाहन केले. या चर्चासत्रात नौसेनेचे सुमित कुमार, श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे जयेंद्र पेडव, उपपोलीस निरीक्षक एच. एल. पाटील , ओएनजीसीचे स्वप्निल ठाकूर, शेखाडी, आरावी, कोंडविल, भरडखोल येथील नागरिक उपस्थित होते .
प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी भारतीय सेना सज्ज- सलमान खान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:18 AM