अलिबाग : दुबईहून समुद्रमार्गे भारतात सराव तपासणीसाठी आलेल्या याॅट बोटीला रेवस बंदरात आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेनंतर याॅटमधील पाच परदेशी प्रवाशांना मुंबई तटरक्षक दल, जिल्हा पोलीस, अग्निशमन दल, सीआयएसएफ पथकाच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. प्रवाशांना वाचविण्यासाठी साधारण दीड ते दोन तास रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. याॅटमधील पाचही परदेशी प्रवासी सुखरूप असून त्यांना मुंबईत नेण्यात आले.
करुणा निधन पांडे (भारतीय), बाथी सार (सेनेगल), कारमेन क्लारे लातुंबो सल्वनी, जयरालड फजनोय नाला, मार्कोनी फाब्रो फर्नांडिस (तिन्ही फिलिपाईन्स) यांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे. एक भारतीय आणि चार परदेशी नागरिक हे दुबई येथून कोचीन, मालदिवमार्गे मुंबईमध्ये याॅटद्वारे आले होते. हे याॅट सौर ऊर्जेवर चालणारे बनविण्यात आले आहे. याॅटच्या समुद्रातील तपासणीसाठी हे पाच जण आले होते. २८ जूनला याॅट रेवस बंदरात पोहोचले होते. याच्टमध्ये बिघाड झाल्याने ते दीड महिन्यांपासून रेवस बंदरात अडकले होते.
गुरुवारी मध्यरात्री याच्टमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून ते पुढील प्रवासाला निघाले होते. मात्र, गुरुवारी सोसाट्याचा वारा सुटल्याने समुद्रही खवळला होता. त्यामुळे याॅट भरकटले. पुढील धोका समजून कप्तानने बंदरातील खडकाच्या बाजूला याच्ट नांगर टाकून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, खडकावर आदळून त्याला छिद्र पडले आणि समुद्राचे पाणी आत शिरले. त्यातच सोलर पॅनलच्या बॅटरीला अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून प्रवाशांनी भारतीय तटरक्षक दलाशी मदतीसाठी संपर्क केला.
प्रशासनाची तत्परता
मुंबईहून भारतीय तटरक्षक दलाने तातडीने चेतक हेलिकॉप्टर पाठवून अलिबाग, मांडवा पोलीस, अग्निशमन दल, आरसीएफ सीआयएसएफ दल यांच्या मदतीने रेक्यू ऑपरेशन करून सकाळी सात वाजता पाचही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. आरसीएफ येथे तातडीचे हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी दिल्याने अडकलेल्या पाचही जणांना याठिकाणी सुखरूप उतरविण्यात आले. मुंबई येथील भारतीय तटरक्षक दल, सीआयएसएफ डेप्युटी कमांडर संदीप चक्रवर्ती, जिल्हा पोलीस दल, अलिबाग आणि मांडवा सागरी पोलीस, सीआयएसएफ दल, अग्निशमन दलाने रेस्क्यू ऑपरेशन झाले.