मिनीट्रेनच्या ताफ्यात भारतीय बनावटीचे इंजिन
By admin | Published: January 16, 2016 12:27 AM2016-01-16T00:27:06+5:302016-01-16T00:27:06+5:30
माथेरान मिनी ट्रेनच्या ताफ्यात नवे इंजिन दाखल झाले आहे. शतक महोत्सव साजरा केलेली नेरळ माथेरान मिनीट्रेन गेली काही वर्षे इंजिने सातत्याने रुळावरून घसरत असल्याने
कर्जत : माथेरान मिनी ट्रेनच्या ताफ्यात नवे इंजिन दाखल झाले आहे. शतक महोत्सव साजरा केलेली नेरळ माथेरान मिनीट्रेन गेली काही वर्षे इंजिने सातत्याने रुळावरून घसरत असल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत होते. मिनीट्रेनच्या नवीन इंजिनासाठी सातत्याने माथेरान नगरपालिका पाठपुरावा करीत होती. कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे माथेरान मिनीट्रेनसाठी नवीन इंजिन घेण्यासाठी निधी देण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे हे इंजिन भारतीय बनावटीचे आहे.
पूर्णपणे भारतीय बनावटीचे तयार करण्यात आलेले हे इंजिन मुंबई मंडळाच्या परळ येथील कार्यशाळेत गेल्या दीड वर्षाच्या काळात तयार झाले आहे. दुसरीकडे परळ येथील तंत्रज्ञानाच्या कार्यकुशल कामामुळे भारतीय रेल्वेच्या कामगिरीत नवीन भर पडली आहे. शतक महोत्सव साजरा करीत असलेल्या मिनीट्रेनसाठी यापूर्वी जी इंजिने आणण्यात आली, ती सर्व इंजिने परदेशी बनावटीची होती. त्यातील वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची जागा आता डिझेल इंजिनाने घेतली आहे. नेरळ लोको शेडच्या ताफ्यात आतापर्यंत पहिली जी तीन डिझेल इंजिने आली, त्यातील एक इंजिन नेरळ-माथेरान मिनिट्रेनसाठी लावले जाते. तर एनडीएम ५०१, ५०२, ६०१, ६०२, ५५०, ५५१ ही सहा इंजिने सध्या मिनीट्रेनच्या ताफ्यात आहेत. असे असतानाही मिनीट्रेन अनेकदा रु ळावरून खाली घसरून पर्यटक प्रवाशांचे हाल होत असतात. मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळाचे महत्त्व अधिक प्रखरपणे जगाच्या पातळीवर नेण्यासाठी लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात परळ येथील तंत्रज्ञांनी अहोरात्र मेहनत घेऊन मिनीट्रेनसाठी नवीन अधिक जास्त ताकदीचे इंजिन तयार केले आहे. ४०० एनडीएम १ हे इंजिन नेरळ येथे पोहोचले असून, ते शुक्रवारी नेरळ लोको शेडमध्ये उतरविले आहे.
यापूर्वीची मिनीट्रेनची सर्व इंजिने ही ३०० हॉर्स पॉवर क्षमतेची होती. ती सर्व इंजिने जेमतेम सहा प्रवासी डबे वाहून नेत होती. मात्र २४ टन क्षमता असलेल्या जुन्या मिनीट्रेन ताफ्यात आता जास्त ताकद असलेले नवीन इंजिन आल्याने मिनीट्रेन अधिक डबे घेऊन प्रवास करू शकतात. नवीन ४०० एनडीएम १ हे इंजिन ३२ हॉर्स पॉवर क्षमतेचे आहे. नवीन इंजिन प्रत्यक्ष रु ळावर येण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असून, नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या मार्गावर हे इंजिन आधी केवळ इंजिन आणि नंतर डबे लावून चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर रेल्वे बोर्डाच्या लखनौ येथील रेल्वेची रिसर्च टीम चाचणी घेणार आहे. सर्वात शेवटी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी हे अंतिम पाहणी केल्यानंतर नवीन इंजिन प्रत्यक्ष ताफ्यात येणार आहे. नवीन इंजिन नेरळ-माथेरान मार्गावर प्रत्यक्ष रु ळावर आल्यानंतर आणखी तीन इंजिने परळ येथील अभियंते तयार करणार आहेत.
रंग बदलला : १९७० ला माथेरान मिनी ट्रेन सुरू झाली. यावेळी दोन इंजिने दार्जिलिंग क्लासची अशी तीन इंजिने सेवेत होती. १९५०च्या दशकात माथेरान मिनीट्रेनच्या ताफ्यात डिझेल इंजिन आली. वाफेवर चालणारी इंजिने माथेरान मिनीट्रेनची सेवा करीत होते. डिझेल इंजिनांच्या रंगात, ढंगात कालांतराने नेहमीच बदल होत गेले, मात्र महाराणीचा डौल मात्र कायम राहिला आहे.