- मधुकर ठाकूर
उरण - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेनुसार भारतामध्ये प्रथमच पाण्याखाली ध्वजारोहण आणि संचलन व शहीद वंदना या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा रविवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी उरणमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
उरण मधील विमला तलाव येथे रात्री १०. ३० वाजता हा सोहळा होणार असून १३ फूट खोल स्विमिंग पूलमध्ये डायविंग उपकरणासहित सुसज्ज असलेल्या भारतीय मरीनच्या माजी कमांडोच्या टीमकडून पाण्याखाली ध्वजारोहण केले जाणार आहे. आणि याच कमांडोंकडून पाण्याखालीच राष्ट्रगीत गायन होऊन ध्वजारोहण आणि ध्वज संचलन होणार आहे. त्यापूर्वी विमला तलावावर उभारण्यात येणाऱ्या तरंगत्या व्यासपीठावर नृत्य आणि संगीत असलेले अमृत महोत्सवाचे कार्यक्रम पार पडणार आहेत.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, डीपी वर्ल्डचे एशिया प्रमुख रिजवान सोमर, जे. एम. बक्सी ग्रुपचे संचालक ध्रुव कोटक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा ध्वजारोहण सोहळा साजरा होत आहे. त्यामुळे राष्ट्रभक्ती दर्शविणारा हा सोहळा उरणकरांसह देशासाठी अभिमानास्पद ठरणार आहे.