नेरळ-माथेरान मिनीट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:07 AM2017-12-09T02:07:19+5:302017-12-09T02:07:31+5:30
दीड वर्षापासून बंद असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असून, यासाठी ८ डिसेंबर रोजी रेल्वेच्या काही प्रमुख अधिका-यांनी येथे भेट देऊन पाहणी दौरा केला.
माथेरान : दीड वर्षापासून बंद असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असून, यासाठी ८ डिसेंबर रोजी रेल्वेच्या काही प्रमुख अधिका-यांनी येथे भेट देऊन पाहणी दौरा केला.
या वेळी रेल्वेचे दिल्ली बोर्डाचे अधिकारी आर.के. वर्मा, वरिष्ठ अधिकारी संजय शर्मा, अॅडिशनल अभियंता सुबोध नाथ हे उपस्थित होते. नेरळ-माथेरान ही मुख्य ट्रेन सुरू झाल्याशिवाय येथील व्यवसाय आणि पर्यटक वाढणार नाहीत, यासाठी येथील स्थानिक शिष्टमंडळाने अधिकाºयांना समक्ष भेटून लवकरच नेरळ - माथेरान मिनीट्रेन सेवा सुरू करावी, असे सांगितले. ३० आॅक्टोबरपासून अमनलॉज-माथेरान अशी शटल सेवा सुरू असल्याने पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. परंतु यामध्ये बोग्यांची संख्या केवळ पाच असून, यामुळे पर्यटकांना बोग्यांच्या मर्यादेमुळे तिकिटे मिळत नाहीत. यासाठी बोग्यांची संख्या वाढवावी, असे माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी सांगितले. तर शटलमध्ये दोन ते तीन फेºया फक्त मालवाहतुकीसाठी केल्यास अनेकांना जीवनावश्यक सामान सहजपणे आणता येईल असे नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. या वेळी भाजपाचे माजी अध्यक्ष अरविंद शेलार, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, राजेश दळवी, वसंत कदम, विजय चौधरी आदी उपस्थित होते.