कारखानदारांच्या समस्यांकडे औद्योगिक महामंडळाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:07 AM2018-04-12T03:07:59+5:302018-04-12T03:07:59+5:30
संपूर्ण कोकणात सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेली महाड औद्योगिक वसाहत ही ‘केमिकल झोन’ म्हणून ओळखली जाते. सुमारे ८०५ हेक्टर क्षेत्रांत उभारलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेला ३0 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
- संदीप जाधव
महाड : संपूर्ण कोकणात सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेली महाड औद्योगिक वसाहत ही ‘केमिकल झोन’ म्हणून ओळखली जाते. सुमारे ८०५ हेक्टर क्षेत्रांत उभारलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेला ३0 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरी कारखानदारांच्या समस्यांकडे मात्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पाण्याची मुबलकता, दळणवळणाची चांगली सोय, मुंबईसारखे महत्त्वाचे शहर जवळ असूनही गेल्या काही वर्षांत या औद्योगिक क्षेत्रात नवीन उद्योग निर्मिती झालेली नाही.
महाड औद्योगिक क्षेत्रात ३५० भूखंड उद्योजकांनी विकत घेतले असले तरी शंभरहून अधिक भूखंडांवर गेल्या ३0 वर्षांत एकही कारखाना उभा राहिलेला नाही. हे भूखंड औद्योगिक विकास महामंडळाने पुन्हा ताब्यात घेणे अपेक्षित होते. महाड औद्योगिक क्षेत्रात आज अनेक गुंतवणूकदार कारखाने उभे करण्यास उत्सुक आहेत. मात्र, भूखंड उपलब्ध नसल्यामुळे या औद्योगिक क्षेत्राचा विकास खुंटला आहे. सध्या या औद्योगिक क्षेत्रात १७० लहान-मोठे कारखाने सुरू आहेत, तर पन्नासहून अधिक कारखाने वेगवेगळ्या कारणांमुळे बंद आहेत. बिर्ला ग्रुपचा कोकण सिंथेटिक फायबर, मल्टी फ्लेक्स, दिपाल फॅब्रिक्स,त्रिंबक इंडस्ट्रीज,रेव्हलॉन पेन,पोद्दार, खटाव ह्या मोठ्या उद्योगांसह अनेक लहान कारखाने आज बंद आहेत.
महाड औद्योगिक क्षेत्रातील नव्वद टक्के कारखाने रासायनिक प्रक्रिया उद्योग करणारे आहेत. त्यामुळे या परिसरात जल, वायू प्रदूषणाचा प्रश्न नेहमीच निर्माण होत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून महाड उत्पादक संघटनेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने या प्रदूषणावर मात करण्यात यश मिळवले आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखाना व्यवस्थापनांंवर सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने कठोर कारवाईची पावले उचलल्यामुळे हे प्रदूषण नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे.
अनेक कारखान्यांनी त्यांची उत्पादन क्षमता वाढवल्यामुळे या कारखान्यांमधून बाहेर पडणारे सांंडपाणी देखील वाढले आहे. मात्र या प्रक्रिया केंद्राची क्षमता संपली असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढवण्याची, तसेच यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी उत्पादक संघटनेकडून केली जात आहे.
तर, सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केलेले सांडपाणी वाहून नेणारी पंचवीस वर्षांहून अधिक जुनी वाहिनी जीर्ण झाल्यामुळे ही अनेकदा ठिकठिकाणी फुटून हे सांडपाणी परिसरातील शेतीमध्ये पसरत असते. ही वाहिनी बदलण्याच्या मागणीकडे देखील एमआयडीसीचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. तसेच एनआयओ संस्थेने निश्चित केलेल्या ठिकाणापर्यंत वाहिनी टाकण्याचे काम तीन वर्षे रखडले आहे. हे नवी वाहिनी टाकण्याचे काम जलदगतीने होण्याची गरज आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रात वाहनतळ नसल्याने वाहन पार्किंगची मोठी समस्या आहे. वाहनतळ नसल्याने मुख्य मार्गांवरच अनेक ठिकाणी अवजड वाहने उभी केली जातात, त्यामुळे अपघात देखील घडतात. मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी गटारे व नाले देखील अस्तित्वात नाहीत, तर असलेल्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाईच केली जात नसल्याने हे नाले तुंबलेल्या अवस्थेत दिसून येतात. यासह औद्योगिक क्षेत्रातील अनेक समस्यांकडे औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाºयांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कारखानदार करीत आहेत.
>कारखानदारांच्या समस्या गंभीरपणे घ्याव्या
महाड औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे एमएमएकडून अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येत आहे. सांडपाणी वाहिनी, ट्रक टर्मिनल याबाबत तरी एमआयडीसीने त्वरित कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. याबाबत आम्ही योग्य लक्ष देऊ.
- अशोक तलाठी, उपाध्यक्ष, एमएमए सीईटीपी
>सर्वेक्षण करून माहिती देऊ : उपअभियंता
औद्योगिक क्षेत्रातील किती कारखाने बंद आहेत, याबाबत सर्वेक्षण करून माहिती देण्यात येईल, असे एमआयडीसीचे उपअभियंता एस.एस. गीते यांनी सांगितले. अधिक बोलण्यास गीते यांनी नकार दिला.