औद्योगिकरणाचा शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:15 AM2020-06-05T00:15:52+5:302020-06-05T00:16:04+5:30

पर्यावरणाची हानी : रायगड जिल्ह्यात जल आणि वायू प्रदूषणाचा गंभीर प्रश्न

Industrialization hits agriculture | औद्योगिकरणाचा शेतीला फटका

औद्योगिकरणाचा शेतीला फटका

Next

आविष्कार देसाई।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : पूर्वी भाताचे कोठार असणाऱ्या रायगड जिल्ह्याची ओळख आता वाढत्या औद्योगिकीकरणामुळे बदलली आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने उद्योगांचे जाळे उभारण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने केमिकल निर्मितीच्या उद्योगांचा भरणा अधिक असल्याने पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शेतांमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. येथील नागरिकांचे प्रामुख्याने शेती आणि मासेमारी हे दोनच व्यवसाय होते. मोठ्या प्रमाणात असलेली शेती आणि त्या माध्यमातून उत्पादन होणाºया भाताचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याने जिल्ह्याला ‘भाताचे कोठार’ म्हटले जायचे. त्याचप्रमाणे मासेमारी करून आपला उदरनिर्वाह सुरू होता. कालांतराने जिल्ह्यातील सपाट आणि सुपीक जमीन धोरणकर्त्यांच्या नजरेतून लपून राहिली नाही. त्यांनी या ठिकाणी उद्योगांचे जाळे उभारले. जिल्ह्यामध्ये तळोजा, अलिबाग, रोहा, माणगाव, विळेभागाड, महाड एमआयडीसी उभारण्यात आल्या. नवरत्न कंपन्यांपैकी एचओसीएल, आरसीएफ, गेल, आपीसीएस, ओएनजीसीसारख्या कंपन्या याच ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने केमिकल निर्मितीच्या कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात उभारण्यात आल्याने याच कंपन्यांमधून प्रदूषणाचा मोठा प्रश्न जिल्ह्यात निर्माण झाला आहे. वायू आणि जलप्रदूषणाने सर्वाधिक डोके वर काढले आहे.
वायुप्रदूषणामुळे कार्बनडाय आॅक्साईडचे उत्सर्जन अधिक वेगाने होत असल्याने परिसरातील नागरिकांना विविध शारीरिक व्याधी जडल्या आहेत. तर दुसरीकडे केमिकल कंपन्यांच्या माध्यमातून निघणाºया सांडपाण्यावर कोणतीच प्रक्रिया न करता ते थेट समुद्र, खाडी, नदी पात्रात सोडण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे वनस्पती, सूक्ष्म जीव, मासे अशा पर्यावरणातील अनेक प्रमुख घटकांवर आघात होत आहे.

सन 2000 ची स्थिती
1. या कालावधीत उद्योगांची, कारखान्यांची संख्या मर्यादित होती.
2. कारखाने कमी प्रमाणात असल्याने नद्या, खाडी, समुद्र यांचे प्रदूषणही कमी होते, त्यामुळे पयावरण संतुलित राहते.
3. जलस्रोत असलेल्या नदी, वहिरींचे प्रदूषित होण्याचे प्रमाण नगण्य असल्याने पिण्यासाठी पाणी शुद्ध होते.
4. प्रदूषण कमी असल्याने समुद्र, खाडी, नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय तेजीत होता.
5. श्वसनाचे विकार, शारीरिक व्याधी जडण्याचे प्रमाणही अतिशय कमी होते. मुळात वातावरण शुद्ध असल्यामुळे मानवी आरोग्य सुदृढ होते.

सध्याची स्थिती
1. या कालावधीमध्ये उद्योग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

2. वाढता विकास, उद्योगामुळे प्रदूषण वाढले आहे.
3. सांडपाण्यामुळे जलस्रोत प्रदूषित होत असल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव
आहे
4. खाडी, समुद्रामध्ये कमी अंतरावर मासेमारी करावी लागते. मात्र आता ८० किमी आत जाऊनसुद्धा मासे कमी प्रमाणात
मिळत आहेत.
5. वाढत्या प्रदूषणामुळे विविध व्याधींचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये कॅन्सर, दमा, डोकेदुखी, डोळ्यांची आग होणे, बहिरेपणा यांचा समावेश आहे.

पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी...
1. नागरिकांनी आपले दैनंदिन कर्बउत्सर्जन कमी करावे. त्यासाठी कर्बपदचिन्हे, जलपदचिन्हे, पर्यावरणीय पदचिन्हे समजून घेऊन कमीतकमी करून जगावे.
2. आपले अन्न शक्यतो स्थानिक पातळीवरील विकत घ्यावे.
3. वस्तू खरेदी करताना त्याचा छुपा वा प्रत्यक्ष पर्यावरणावर
काय परिणाम होणार आहे याचा विचार करावा आणि ती वस्तू घ्यायची की नाही, ते ठरवावे.
4. पर्यावरणावर आणि कर्बउत्सर्जन कमी करण्यासाठी जागरूकपणे व्यक्त व्हा.
5. पाणी किती अंतरावरून येते ते पाहावे. लांबून येत असेल, तर कर्बउत्सर्जन वाढते. पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्यांना सवलत द्यावी आणि जे करीत नाहीत त्यांना शिक्षा व्हावी.
6. निसर्ग आॅक्सिजन देतो. आपण निसर्गाला काय परत देतो, याचा विचार करा. भावी पिढीला आॅक्सिजन मुबलक मिळावा म्हणून झाडे लावा.
7. शेतकरी, आदिवासी हे झाडांचे रक्षण करतात. त्यांना सरकारने अनुदान द्यावे. मग लोक झाडे जपतील.
8. कोणताही प्रकल्प आणताना त्याचा तत्काळ होणारा फायदा न पाहता भविष्यातील आपत्तीवर विचार व्हावा.
9. बायोडिझाईन तयार करून इमारती उभ्या राहिल्या, तर निसर्ग आपत्ती आणणार नाही.
10. शहरे हरित करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे.

Web Title: Industrialization hits agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.